पंढरपूर : कार्तिकी यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेला घोडेबाजार यंदापासून सुरु व्हावा यासाठी तब्बल बारा वर्षानंतर देशभरातील घोडे व्यापारी आपले दर्जेदार अश्व घेऊन पंढरपूरच्या बाजार समितीत दाखल होऊ लागले आहेत. महाबळेश्वरमध्ये घोड्ंयाना एक साथीचा विकार आला आणि यातूनच 2008 साली भरावलेला घोड्याचा बाजार प्रशासनाने उठवला आणि हा बाजार त्या वर्षी अकलूज येथे हलविण्यात आला. यानंतर गेली 12 वर्षे कार्तिकीचा घोडेबाजार अकलूज येथेच भरतो आहे. मात्र, या व्यापाऱ्यांना कार्तिकी यात्रेतून मिळणारे आयते गिऱ्हाईक मिळत नसल्याने पुन्हा या व्यापाऱ्यांनी आपली पावले विठुरायाच्या पंढरीत वळवली आहेत. 
      
पंढरपूरला भरणाऱ्या यात्रा या आध्यात्मिक वाटत असल्या तरी यामागे शेती, अर्थकारण व क्षात्रतेजाची परंपरा आहे. आषाढी काळात पालखी व दिंड्या समवेत खरीप पेरणी करून शेतकरी वारकरी पायी वारी करत व गावोगावी थांबत एकमेकांशी संपर्क ठेवत. यातूनच पुढे रोटी बेटी व्यवहार होत. कार्तिकी काळात खरीप आटोपून रब्बी पेरणी होते. याकाळात जनावरे पुष्ट असतात. त्यांना कार्तिकी यात्रेत विक्रीसाठी आणलं जाई. पूर्वी युध्द व राजकीय कामांसाठी अश्व गरजेचे होते. यास्तव पंढरीच्या कार्तिकीचा घोडे बाजार प्रसिद्ध झाला. 


कर्नाटक, मराठवाडा, मध्य प्रदेशसह देशभरातील विविध भागातून कार्तिकी बाजारात घोडे विक्री करणारे व्यापारी आणि खरेदीदार येत असत. ही परंपरा वर्षानुवर्षे चालत राहिली होती. आता गेल्या बारा वर्षांपासून बंद पडलेली ही परंपरा सुरु करण्यासाठी व्यापारी आग्रही बनले असून पंढरपूरच्या बाजारासारखा व्यवसाय इतरत्र होत नसल्याने या व्यापाऱ्यांनी आपले घोडे घेऊन थेट पंढरपूर बाजार समितीमध्ये ठिय्या मांडला आहे. दरम्यान सध्या महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या व्यापाऱ्यांचे अश्व दाखल झाले असून अजूनही प्रशासनाने या घोडेबाजाराला परवानगी दिलेली नाही. पंढरपूर बाजार समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे यासाठी परवानगी मागितली असून शेकडो वर्षाची कार्तिकी यात्रेतील घोडे बाजाराची परंपरा पुन्हा सुरु व्हावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान दाखल झालेल्या व्यापाऱ्यांनी आम्ही अकलूजच्या बाजारात जाणार नसल्याची भूमिका घेतल्याने आता बाजार समिती आणि जिल्हा प्रशासनाला याबाबत तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे.