मुंबई : कोरोना वायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जगभरात एन 95 मास्क मोठ्या प्रमाणावर वापरले जात असताना मुंबईत या मास्कचा काळाबाजार सुरू असल्याचे एबीपी माझाने काल मुंबईतील मेडिकलचा रियालिटी चेक करून निदर्शनास आणून दिल्यानंतर आता राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्तांनी याची दखल घेत अशा एन 95 काळाबाजार करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जो औषध विक्रेता अशा प्रकारची एन 95 मास्कची साठवणूक करून वाढीव भावाने विकत असेल त्यावर निरीक्षकांना दक्ष राहायचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत


एकीकडे कोरोनाचे संशयित रुग्ण देशात वाढत असताना काळजी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एन 95 मास्कचा आग्रह केला जात आहे. त्यामुळे एन 95 मास्क मोठ्या प्रमाणवर खरेदी केली जात आहे. आता सद्यस्थितीत मुंबईतील अनेक मेडिकलमध्ये हे एन 95 मास्क उपलब्ध नसल्याचं चित्र आहे. मात्र ज्या मेडिकलमध्ये हे मास्क उपलब्ध आहेत ते औषध विक्रेते चार ते पाचपट भावाने ग्राहकांना विकत असल्याचे लक्षात येताच एबीपी माझा टिमने हे समोर आणण्यासाठी स्टिंगच्या माध्यमातून हा सगळा काळाबाजार कसा चालतो हे समोर आणलं. ज्या एन 95 मास्कची किंमत 35 ते 70 रुपये इतकी आहे ते मास्क अनेक मेडिकलवर 250 ते 400 रुपये अशा वाढीव किंमतीने विकत आहेत.


#CoronaMask Sting operation 30₹चा कोरोनाचा N95 मास्क 400रुपयांना? मास्कचा काळा बाजार कोण करतंय?




हा सगळा काळाबाजार नेमका कसा चालतो ? यावर डिस्ट्रिब्युटर हिमांशू शाह यांनी सांगितलं की, हा सगळा व्यवहार अनेक मेडिकल मालकांकडून, डिस्ट्रिब्युटरकडून केला जात आहे. यामध्ये जो काही एन 95 मास्कचा माल येतोय तो वाढीव भावाने मेडिकल मालकांना विकला जातोय हा विकला जात असताना मेडिकल मालकांना बिल दिल जात नसून सुट्टे मास्क विकले जात आहेत. हे एन 95 मास्क सुट्टे असल्या कारणाने त्यावरील खरी किंमत एमआरपी लपवून वाटेल त्या भावाने ग्राहकांना विकले जात आहेत.


हे मास्क नेमके तयार कसे होतात ? खरंच याचा तुडवडा का जाणवतोय ?, त्याची मूळ किंमत काय ? हे जेंव्हा विनस कंपनीचे संचालक रवींद्र शिंदे यांच्याकडून समजून घेतलं, तेंव्हा या मास्कची खरी किंमत 35 रुपये, 40 रुपये असून हे सगळे मास्क याच भावात शासकीय रुग्णलायात, इतर सरकारी उपाययोजना साठी दिले जात असल्याचे त्यांनी सांगितलं. या आधी नवी मुंबईतील तळोजा विनस प्लांट मध्ये जे मास्क दरदिवशी 20 हजार इतके तयार होत होते ते 50 हजार इतके वाढीव उत्पादन करून सरकारला पुरवले जातायेत. तर 2 ते 3 हजार मास्क हे डिस्ट्रिब्युटर यांना दिले जातायेत. त्यामुळे ग्राहकांनी वाढीव किंमतीने हे मास्क घेण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं. हा सगळा प्रकार जेंव्हा समोर आला तेंव्हा त्यावर तात्काळ करावाईचे आदेश दिल्यानंतर आता औषध विक्रेत्यांवर अशा प्रकारची मास्क विक्री करण्यावर चाप बसले शिवाय राहणार नाही.


संबंधित बातम्या :


Coronavirus | देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 30 वर, दिल्लीतील प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद


ब्रिटनचा कोरोना संशयित पर्यटक गोमेकॉत दाखल