मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत रामजन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत. मात्र, ठाकरेंना या दौऱ्यात शरयू आरतीमध्ये सहभागी होता येणार नसल्याचं कळतंय. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं उत्तरप्रदेश सरकारनं एक नियमावली तयार केलीय. त्यानुसार ठाकरेंना शरयु आरतीमध्ये सहभागी होता येणार नसल्याचं कळतंय. दरम्यान, शिवसेनेनं हिंदुत्वाची कास सोडली नसल्याचं अधोरेखित करण्यासाठी हा अयोध्या दौरा होत असल्याची चर्चा आहे. कालच ठाणे आणि नाशिकमधून काही शिवसैनिक अयोध्येच्या दिशेनं रवाना झाले आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि योगी आदित्यनाथ यांच्यात काल फोनवरुन बातचीत झाल्याची माहिती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना वायरससंदर्भात काढलेल्या एडवायझरीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. उत्तर प्रदेश सरकारकडून या दौऱ्यासाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षा पुरविली जाणार आहे. देशात सध्या कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी सार्वजनिक कार्यक्रम टाळण्यावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडूनही या संदर्भात काही निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरयू तीरावर आरतीसाठी गर्दी होऊ नये. म्हणून दौऱ्यातील आरतीचा कार्यक्रम वगळावा, अशी विनंती करण्यात आली होती. देशातील एकूण परिस्थिती लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी ही विनंती मान्य केली आहे, असे त्यांनी सांगितले.

Ayodhya Tour | अयोध्या दौऱ्य़ात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरयू आरती करणार नाही : सूत्र



29 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांच्या पाठिंब्यावर राज्यात सत्तास्थापन केली. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर (शिवाजी पार्क, दादर) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मार्च महिन्यात या सरकारला 100 दिवस पूर्ण होतील. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत.

त्याअगोदर 25 नोव्हेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु करण्यापूर्वी उद्धव यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते. राम मंदिर हा शिवसेना-भाजप युतीचा लोकसभा निवडणुकीपूर्वीचा महत्त्वाचा अजेंडा होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते.

संबंधित बातम्या : 

चलो अयोध्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत असंख्य शिवसैनिकही अयोध्येला जाणार

अयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचं खरं रक्त जागं होईल; फडणवीसांचा शिवसेनाला टोला