Vijay Wadettiwar नागपूर : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांचावरील गोळीबाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून नावालाही कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. हे सर्वकाही वसुलीबाज सरकारचा परिणाम आहे. राज्यात गुंडांचा मुक्त संचार असून घोसाळकर यांचे प्रकरण सत्ताधारी लोकांमुळे झाले आहे. तसेच हा सर्व पूर्वनियोजित कट असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला. या हत्येमागे सत्ताधारी पक्षातील प्रवक्ता जे नेहमी पुढे पुढे करतात, ती व्यक्ती महिला की पुरुष हे लवकरच कळेल. त्यांनी रचलेल्या कटाचा बळी घोसाळकरांच्या रुपाने गेला, असं वडेट्टीवार म्हणाले. ते शुक्रवारी नागपुरात बोलत होते.
हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता
घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा एक महिला किंवा पुरुष प्रवक्ता आहे. पुढे होणाऱ्या चौकशीत त्यांचे नाव समोर येईल. मात्र, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी अपेक्षा आहे. या मागे सत्ताधारी पक्षाचा एक नेता असून चौकशी पूर्वी मी त्याचे नाव घेणे योग्य नाही. मात्र हे नाव लवकरच सर्वांपुढे असेल, असे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले. एकूणच राज्य बिहार आणि उत्तर प्रदेश पेक्षाही वाईट अवस्थेत जात आहे. राज्याला वाऱ्यावर सोडून सत्ता आणि संपत्तीसाठी खुर्चीचा गैरवापर केला जात आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा लौकिक नाहीसा झाला आहे. एक म्हणतो पकडा, तर एक म्हणतो सोडा असे चित्र सध्या आहे. त्यात राज्याचे गृहमंत्री सध्या हतबल झाले आहे. त्यांची अवस्था अडकित्यात अडकलेल्या सुपारी सारखी झाली असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.
जे गेले ते काय बिना दबावाने गेले का?
उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबिक संबंध असलेले नेते आणि आमदार रवींद्र वायकर हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार असल्याचे चित्र आहे. या बाबत वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले, सत्ताधारी पक्षांकडून केंद्रीय शक्तींचा गैरवापर आणि दबाव आणला जात आहे. रवींद्र वायकर असतील किंवा इतर कोणी, जे गेले ते काय बिना दबावाने गेले का, सर्वकाही स्पष्ट असल्याची प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.
बावनकुळे काय म्हणाले हे मी ऐकले नाही. मात्र राहुल गांधी चुकीचे बोलले नाही. 2000 सालापूर्वी मोदींची जात ओबीसी मध्ये नव्हती, यात काय ओबीसीचा अवमान झाला. ओबीसी महिला, विद्यार्थी यांच्यासाठी तुम्ही काय करत आहात, असा सवाल वडेट्टीवार यांना चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारला आहे. कॅबिनेट न घेता मराठा आरक्षणबद्दल सरकार ने जे जीआर काढले आहे, त्याबद्दल बावनकुळे यांनी राजीनामा द्यावा त्यानंतर आम्ही देऊ, असे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.
VIjay Wadettiwar on Abhishek Ghosalkar case VIDEO : विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?