ऐरोली मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्याने युतीमध्येच सध्या जुंपली आहे. या मतदार संघात लोकसभेला खासदार राजन विचारे यांना 44 हजारांचं मताधिक्य मिळाल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी मनाचे मांडे खाण्यास सुरवात केली होती. मात्र अचानक संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्याने शिवसेनेच्या नेत्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. शिवसेना भाजपाची युती झाल्यास हा मतदार संघ संदीप नाईकसाठी भाजपाच्या पारड्यात पडेल. नवी मुंईतील अनेक नगरसेवकांनी संदीप नाईकांबरोबर भाजपाचे कमळ हाती घेतल्याने ऐरोली मतदार संघात राष्ट्रवादी अस्तित्वहिन झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडे फक्त तीन नगरसेवक असल्याने आघाडीकडून तगडी फाईट होणं मुश्किल आहे.
इतिहास आणि सद्यस्थिती काय आहे.
ठाणे जिल्ह्यातील बेलापूर विधानसभा मतदार संघाचे विभाजन होऊन नवी मुंबईत ऐरोली आणि बेलापूर असे दोन विधानसभा अस्तित्वात आले. नवी मुंबईचे नेते असलेले गणेश नाईक यांनी आपले चिरंजीव संदीप नाईक यांना 2009 साली ऐरोली मतदारसंघात उतरवत राष्ट्रवादीचे आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आणलं. याआधी नवी मुंबई महानगरपालिकेत संदीप नाईक स्थायी समिती सभापती होते. यानंतरच्या 2014 सालच्या निवडणुकीत संदीप नाईक यांनी दुसऱ्यांदा ऐरोली विधानसभेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला असला तरी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे त्यांचा विजय सुकर झाला होता.
मात्र गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेले आहे. ऐरोली मतदार संघात शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांपेक्षा वाढली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना ऐरोली मतदार संघातून तब्बल 44 हजाराचं मताधिक्य मिळाल्याने संदीप नाईक यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. येणारी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढणं सोपं नसल्याने संदीप नाईक यांनी कमळ हाती घेत भाजपाचा रस्ता धरला. संदीप नाईक यांच्या भाजपा प्रवेशाने ऐरोलीतून इच्छूक असलेल्या शिवसेना नेत्यांचा हिरमोड झाला आहे. युती झाल्यास हा मतदार संघ भाजपाच्या पारड्यात जाणार असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे. पण युती न झाल्यास संदीप नाईक यांच्यासमोर शिवसेनेकडून तगडं आव्हान उभं राहू शकते.
महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्र वडार मंडळाचे अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा असलेले विजय चौगुले, ज्येष्ठ नगरसेवक एम के मढवी, व्दारकानाथ भोईर यांच्यापैकी एकाला शिवसेना उमेदवारी देवू शकते. ऐरोली मतदार संघात 57 नगरसेवक असून यात शिवसेना 26, राष्ट्रवादी काँग्रेस 22, काँग्रेस 3, भाजप 2 आणि अपक्ष 4 संख्याबळ आहे. संदीप नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या 22 आणि अपक्ष 4 नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला असल्याने संदीप नाईक यांचं पारडं जड झालं आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीची अस्तित्वाची लढाई सुरू आहे. त्यांच्याकडे सध्या विधानसभा लढण्यासाठी उमेदवार मिळेनासा झाला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची ताकद तोळामासा असल्याने इथे आघाडीकडून आव्हान उभे राहण्याची शक्यता एकदम धुसर आहे. त्यामुळे ऐरोली मतदार संघात खरी लढत ही शिवसेना विरूध्द भाजप अशीच होणार आहे.
शिवसेना-भाजपा युती झाल्यास..
विधानसभेत शिवसेना भाजपा यांची युती झाल्यास ऐरोली विधानसभा भाजपाच्या पारड्यात जावू शकते. संदीप नाईक यांनी भाजपात प्रवेश करताना मुख्यमंत्र्यांकडून तसा शब्द घेतल्याने शिवसेनेला ही जागा सुटणं जवळपास दुरापास्त मानलं जातंय. संदीप नाईक यांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेनेचे पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि ज्येष्ठ नगरसेवक एम के मढवी हे संदीप नाईक यांचा प्रचार करणार का याकडे आता नवी मुंबईकरांचे लक्ष लागलं आहे.
भौगोलिक रचना आणि जातीय समीकरण..
ऐरोली विधासभा मतदार संघ हा मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टी बहुल म्हणून ओळखला जातो. 57 नगरसेवकांपैकी जवळपास 20 नगरसेवक हे झोपडपट्टी बहुल भागातून निवडून येतात. त्यामुळे शहरी भागाबरोबर झोपडपट्टी आणि स्थानिक आगरी कोळी लोकांच्या गावठाणातील प्रश्न हे मूळ समस्या आहेत. तुर्भे झोपडपट्टीत चार नगरसेवकांना निवडून आणणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी नाईकांबरोबर भाजपात जाण्यास नकार दिला असून शिवसेनेकडे त्यांची जवळीक वाढल्याने संदीप नाईकांना याचा फटका बसू शकतो. एपीएमसी मार्केटमुळे माथाडी वर्गाची मोठी मतदारसंख्या ऐरोली विधानसभेत आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी लोकसभेआधीच भाजपाशी जवळीक केल्याने याचा फायदा संदीप नाईकांना मिळणार आहे.
मतदार संघातील प्रलंबित प्रश्न..
1) प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोठी बांधलेल्या घरांना कायमस्वरूपी करणं, त्यांना प्रॉपर्टी कार्डाचं वाटप करणं
2) ऐरोली येथील रखडलेले नाट्यग्रह
3) दिघामधील अनधिकृत इमारतींचा न सुटलेला प्रश्न
4) ऐरोली, कोपरखैरणे येथील पार्किंगचा प्रश्न गंभीर
मतदार संघातील सुटलेले प्रश्न ....
1) ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे, महापे येथील उड्डाणपुलांचे काम पूर्ण
2) मुलूंड - ऐरोली - कटईनाका उन्नत मार्गाला मंजूरी मिळून कामाला सुरवात
3) ऐरोलीतील जैवविविधता केंद्र सुरू करून खाडी पर्यटनाला चालना
4) घणसोली मध्ये भव्य सेंट्रल पार्कची निर्मिती
2014 विधानसभा निकाल
1) संदीप नाईक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (विजयी ) – 76444
2) विजय चौगुले – शिवसेना – 67719
3) वैभव नाईक – भाजप – 46405
2) विजय चौगुले – शिवसेना – 67719
3) वैभव नाईक – भाजप – 46405
संभाव्य उमेदवार 2019
१) भाजप – संदीप नाईक, आनंत सुतार, चेतन पाटील.
२) शिवसेना – विजय चौगुले, एम के मढवी, द्वारकानाथ भोईर
३) काँग्रेस – रमाकांत म्हात्रे, अंकुश सोनवणे.
४) राष्ट्रवादी काँग्रेस – सुरेश कुलकर्णी, शंकर मोरे, चंदू पाटील.
५) मनसे – निलेश बाणखिले
६) वंचित बहुजन आघाडी – खाजामियां पटेल.