मुंबई: आकर्षित करुन घेणारे शाळेचे युनिफॉर्म, एकसारखे बूट, बेल्ट वगैरे घातलेली शाळेची मुलं आपण पाहिली आहेत. मात्र भरजरी नऊवारी गुलाबी साडी आणि गुलाबी ब्लाऊज असा युनिफॉर्म घालून, काठी टेकत एका रांगेत शाळेत जाणाऱ्या आजीबाईंचा गट तुम्ही पाहिलाय?


ठाणे जिल्ह्यातील पालघरमध्ये अशीच एक शाळा आहे, जी फक्त आजीबाईंसाठीच आहे आणि या शाळेचं नावही 'आजीबाईंची शाळा' असंच आहे.

लख्ख गुलाबी साडीत सर्व आजीबाई शाळेत येतात आणि लिहायला, वाचायला, गुणायला, भागायला शिकतात. या आजीबाई मराठीतून धडे गिरवत आहेत.



नातवंडांना शाळेत सोडायला आलेले आजी-आजोबा आपण पाहिले आहेत. मात्र इथे नातवंडंच आपल्या आजीला शाळेत सोडायला येतात.

गेल्या वर्षी महिला दिनी म्हणजेच 8 मार्च 2016 रोजी ही आजीबाईंची शाळा सुरु झाली. 60 ते 90 वयोगटातील 27 आजीबाईंनी या शाळेत प्रवेश घेतला. 90 वर्षीय सीताबाई देशमुख या शाळेतील सर्वात वयोवृद्ध विद्यार्थिनी.



सीताआजीचं वय वाढलं म्हणून काय झालं, त्यांची शिकण्याची उमेद  मोठी आहे. चालायला त्रास होत असला, तरी आपल्या 8 वर्षांच्या नातीसोबत त्या काठी टेकत शाळेत येतात.

"मी माझ्या आयुष्यात शाळेत गेले नाही.


मला शिकण्याची संधीच मिळाली नाही.


मी लहान होते, तेव्हा घरची परिस्थिती गरीब होती.


शिवाय त्यावेळी मुलींना शाळेत पाठवत नव्हते.


मात्र आता मी नवं आयुष्य जगत आहे", असं सीताआजी म्हणतात.


सीताआजी शाळेत जाते म्हटल्यावर गृहपाठ असणारच. मात्र चिमुकली अनुष्का (नात) आजीला गृहपाठासाठी मदत करते.

"आम्ही दोघी एकत्र अभ्यास करतो.


आम्हाला खूप मज्जा येते", असं अनुष्का म्हणते.


यंदाच्या प्रजासत्ताक दिनी आजीबाईच्या शाळेला नवी आणि मोठी जागा मिळाली. मोठी आणि मोकळी जागा, बाग असं रमणारं चित्र शाळेसमोर आहे.

या आजीबाईंनी यंदाचा प्रजासत्ताक दिन, पालघरच्या जिल्हा परिषद शाळेत साजरा केला. तिरंग्याला कडक सॅल्युट करुन, लहानग्यांसोबत राष्ट्रगीतही गायलं.



जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक योगेंद्र बांगर यांनी मोतीराम दलाल चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने आजीबाईंची शाळा सुरु केली.

म्हातारपणी किमान पोथी, धार्मिक पुस्तकं वाचता यावी, अशी अपेक्षा एका आजीने व्यक्त केली आणि योगेंद्र बांगर सरांच्या डोक्यात आजीबाईंच्या शाळेची कल्पना सुचली.

बांगर यांनी केवळ कल्पनात रमणं पसंत केलं नाही. त्यांनी मोतीराम दलाल ट्रस्टच्या माध्यमातून एक छोटी रुम बांधली. पण शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य स्वखर्चातून खरेदी केलं आणि सुरु झाली आजीबाईची शाळा.

"मी डोनेशन/देणगी स्वीकारत नाही.


मला यासाठी जास्त खर्चही नाही.


मला वाटतं ही माझीचं मुलं आहेत आणि त्यामुळेच मी हे करतो.


 शिवाय मी एक शिक्षकही आहे,


त्यामुळे ते माझं कर्तव्यही आहेच"


असं बांगर सर म्हणतात.


सध्या शाळेला नवी जागा मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही वाढणार आहे. शेजारच्या गावातील आजीबाईही या शाळेत येण्यासाठी इच्छुक आहेत.

या आजीबाईंना शिकवण्याचं काम 30 वर्षीय शितल मोरे करतात. शितल स्वत: दहावी शिकलेल्या आहेत. लग्नानंतर त्या पालघरमध्ये आल्या.

तू आजीबाईंना शिकवशील का, असं बांगर सरांनी मला वर्षभरापूर्वी विचारलं. त्यावेळी मी आनंदाने त्यांना होकार दिला, असं शितल सांगतात.



"मी आजीबाईंना स्वत:चं नाव लिहायला, वाचायला शिकवते. या सर्व आज्ञाधारक आणि उत्साही विद्यार्थिनी आहेत. माझ्या सासूबाईही या शाळेत शिकतात. माझे पती प्रकाश मोरे यांनीच या जागा दिल्यामुळे शाळा नव्या जागेत सुरु झाली.  त्यामुळे या शाळेवर माझं जीवापाड प्रेम आहे", असंही शितल सांगतात.

नव्या शाळेच्या वर्गाभोवती अनेक झाडं आहेत. प्रत्येक आजीबाईने एक झाड लावलं आहे. त्यामुळे ही झाडं त्यांची ओळख आहे.

"आम्ही सर्व म्हाताऱ्या एकाच शाळेत शिकतो, मज्जा करतो.


आम्ही लवकरच पिकनिकला जाणार आहोत",


असं एक 65 वर्षांची विद्यार्थिनी कांताबाई सांगतात.