नवी दिल्ली: नजरचुकीनं सीमारेषा ओलांडून पाकच्या हद्दीत शिरलेल्या चंदू चव्हाणवर पाकिस्तान लष्करानं अनन्वित अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. चंदूला वारंवार बेदम मारहाण केली जायची. तसंच त्याला सातत्यानं ड्रग्जची इंजेक्शन दिली जात होती. अशी धक्कादायक माहिती चंदूचा भाऊ भूषण चव्हाणनं दिली आहे.


कैदेत असताना चंदूला पुरेसं अन्नही दिलं जात नसल्याचं चंदूच्या भावानं सांगितलं आहे. तब्बल 4 महिन्यांनी भारताच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पाकिस्ताननं चंदूची सुटका केली होती.

सध्या चंदूवर अमृतसरच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यावेळी कुटुंबीयांच्या भेटीत चंदूनं पाकच्या अत्याचाराची माहिती दिल्याचं भूषण चव्हाणानं म्हटलं आहे.

भूषण म्हणाला की, 'अटक केल्यापासून चंदूला अंधाऱ्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. चंदूनं अटक झाल्यानंतर 21 जानेवारीला पहिल्यांदा वाघा बॉर्डरवर उजेड पाहिला. त्याला वारंवार मारहाण केली जात होती. तसेच त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून पाकिस्तानी लष्कर त्याला एका कॅम्पमधून दुसऱ्या कॅम्पमध्ये नेत होते. चंदूची बोटं तुटली असून त्याच्या गुडघ्यालाही मार लागला आहे.'

'या सर्व प्रकारामुळे चंदू थोडासा खचला आहे. पण काहीच दिवसात तो ठीक होईल.' अशी माहिती चंदूच्या आजोबांनी दिली.

कोण आहेत चंदू चव्हाण?
चंदू चव्हाण मूळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचा. चंदू 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात आहे. तो जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे. 29 सप्टेबरला चंदूने चुकून सीमा ओलांडली होती. त्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागला. या बातमीनं धक्का बसून चंदूच्या आजीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. अखेर संरक्षण खात्यानं केलेल्या योग्य वाटाघाटी आणि शिष्टाईमुळे चंदूला परत आणण्यात यश आलं.

चंदू चव्हाण यांना भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही चंदू चव्हाण यांना मायदेशी आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात होते.

चंदू 2012 मध्ये सैन्यात भरती झाले होते. 22 वर्षीय चंदू यांनी दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. चंदू यांचा मोठा भाऊ भूषणदेखील लष्करात आहे. ते सध्या 9 मराठा रेजिमेट कार्यरत आहेत.

संबंधित बातम्या :


पाकिस्तानकडून भारतीय जवान चंदू चव्हाण यांची सुटका

भारतीय जवान चंदू चव्हाण आमच्याच ताब्यात, पाकिस्तानची कबुली

जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

पाकचा खोटारडेपणा, आता म्हणतात चंदू चव्हाण आमच्याकडे नाहीच!

22 वर्षांचा चंदू चव्हाण, भाऊही मिलिट्रीत, लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपलं

पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान धुळ्याचा

धुळ्याचा जवान पाकच्या ताब्यात, बातमी समजताच आजीचा मृत्यू

होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?

चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात