हिंगोली : तुम्ही बैल जोडी, घोडा, म्हैस यांची किंमत लाखांच्या घरात असल्याचं ऐकलं असेल. पण हिंगोलीमध्ये एका बोकडाची किंमत सध्या लाखांच्या घरात आहे. या बोकडावर आतापर्यंत बारा ते तेरा लाख रुपयांची बोली लागली आहे. मात्र शेतकरी 16 लाख रुपयांवर ठाम आहे.

एवढी किंमत कशामुळे?

बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव बोकडाची कुर्बानी देतात. त्यामुळे बोकडांना मोठी मागणी असते. हिंगोली जिल्ह्यात एक असं बोकड आहे, ज्याला लाखोंची किंमत आहे. एरवी पाच, 10 ते 20 हजार रुपयांना विकलं जाणारं बोकड लाखांच्या घरात जाण्याचं खास कारण आहे. हा बोकड साधासुद्धा नाही. या बोकडाच्या डोक्यावर मुस्लीम धर्मियांची अपार श्रद्धा असलेले चाँद-तारा आहे.



हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील येडुत या गावचे अल्पभूधारक शेतकरी श्रीकांत घुगे यांचा हा बोकड आहे. या बोकडामुळे श्रीकांत घुगे यांचं नशीब फळफळलंय. त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल एवढ्या किंमतीला या बोकडाची मागणी आहे.



दीड वर्षांपूर्वी श्रीकांत घुगे यांनी चार शेळ्या विकत घेतल्या होत्या. कालांतराने त्यांना तीन करडं झाली. त्यामधील दोन करडं विकली, पण या करडाच्या डोक्यावर चाँद असल्यामुळे त्यांनी त्याला विकलं नाही. घुगे यांचं बोकड नावाप्रमाणेच चाँद आहे.. रंगाने काळं असलेल्या बोकडाचं वजन 53 किलो आहे. याच्या डोक्यावर चाँद आहे, तर दोन शिंगांमध्ये तारा आहे.

आतापर्यंत 12 ते 13 लाख रुपयांपर्यंत बोली

मुस्लीम समाजाचा सण बकरी ईद जवळ आल्यामुळे श्रीकांत घुगे हा बोकड विकणार आहेत. या बोकडाच्या डोक्यावर चाँद-तारा आहे हे समजल्यामुळे मुस्लीम बांधव आणि व्यापारी या बोकडाला पाहायला मोठ्या संख्येने रोजच येत आहेत. हे व्यापारी या बोकडाला साडेतीन ते चार लाख रुपयांना मागत आहेत.



दरम्यान, आतापर्यंत या बोकडाची सात लाख इतकी बोली लागल्याचं श्रीकांत घुगे सांगतात. आता या बोकडाची बोली बारा ते तेरा लाख इतकी झाली आहे. त्यामुळे 16 लाख रुपयांशिवाय हा बोकड विकणार नाही, असं श्रीकांत घुगे यांचं म्हणणं आहे.



बोकडाच्या पैशातून श्रीकांत घुगे आपलं बँकेचं कर्ज फेडणार आहेत आणि उरलेल्या पैशातून मुला-मुलींचं शिक्षण आणि लग्न करणार असल्याचं सांगतात. पशुपालन हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा जोडधंदा आहे. याच जोडधंद्यामुळे श्रीकांत घुगे आता कर्जमुक्त होणार आहेत.