धुळे : खासदार हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांचीही बदली करण्यात आली.


नंदुरबारच्या भाजप खासदार हिना गावितांच्या गाडीवर मराठा आंदोलनादरम्यान हल्ला करण्यात आला. हिना गावित यावेळी स्वतः गाडीमध्ये होत्या. हा मुद्दा त्यांनी संसदेत उपस्थित केला आणि पोलीस अधीक्षकांची बदली करावी, तसेच हल्लेखोरांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली आहे.

हिना गावित यांनी संसदेत मुद्दा उपस्थित करताच संध्याकाळीच पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली होती. सध्या चार जणांना अटक करण्यात आली असून आणखी 15 ते 20 जणांची ओळख पटलेली आहे. त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना हिना गावितांच्या गाडीला आंदोलकांनी लक्ष्य केलं. त्यांच्या गाडीवर चढून आंदोलकांनी गाडीच्या काचा फोडल्या. यावेळी हिना गावित प्रचंड घाबरल्या होत्या. उपस्थित असलेल्या पोलिसांनी हल्लेखोरांना रोखण्याचा साधा प्रयत्नही केला नाही, असा आरोप त्यांनी केला.

संसदेत हिना गावित काय म्हणाल्या?

मी आदिवासी महिला खासदार असल्यानेच जाणीवपूर्वीक मलाच लक्ष केलं, असा आरोप खासदार हिना गावित यांनी केला.

डीपीसीच्या मिटींगला काल इतरही लोकप्रतिनिधी होते. केवळ मला लक्ष्य करण्यात आले. दहा ते पंधरा जणांनी माझ्या गाडीवरती हा हल्ला केला, गाडी पलटवण्याचा प्रयत्न केला. मी गाडीतून उतरले नसते, तर माझा मृत्यूही झाला असता, असं हिना गावित यांनी सभागृहात सांगितलं.

त्याठिकाणी केवळ चार पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते, त्यांनी या हल्लेखोरांना रोखण्याचं काम केलं नाही. ते केवळ बघत राहिले, असा आरोपही खासदार गावित यांनी केला.

तोडफोड करणाऱ्या या पंधरा जणांवरती एफआयआर दाखल झाला,  पण नंतर त्यांना दोन तासाच्या आत सोडून दिलं. ज्या व्यक्तीने हा हल्ला केला त्याचा हार तुरे घालून सत्कार करण्यात आला, असं काय त्यांना फार मोठं काम केलेला आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मी आदिवासी महिला खासदार आहे, माझं रक्षण पोलीस करु शकत नसतील, तर या राज्यात महिला सुरक्षित आहेत का? या संदर्भात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी खासदार हिना गावित यांनी केली.

हल्ल्याविरोधात सर्वपक्षीय एकवटले

हिना गावितांवरील हल्ल्याविरोधात सर्वपक्षीय एकवटले आहेत. भाजपसह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते याविरोधात एकत्र आले आहेत. विश्व आदिवासी दिवस नऊ ऑगस्ट रोजी मराठा मोर्चाचं आंदोलन किंवा बंद हिंमत असेल तर नंदुरबार जिल्ह्यात करून दाखवा, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख आमशा पाडवी यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

धुळ्यात मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावितांची गाडी फोडली  

खा. हिना गावितांवरील हल्ल्याचा निषेध, नंदुरबारमध्ये कडकडीत बंद