पंढरपूर : शेकापचे ज्येष्ठ नेते आणि विधिमंडळाचे विद्यापीठ अशी ओळख असलेल्या गणपतराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. आयुष्यभर लाखो लोकांचे प्रेम मिळविणारा नेता असल्यानेच कोरोनाच्या संकटातही त्यांच्या अंत्यसंस्काराला हजारो लोकांचे वैभव जगाला पाहायला मिळाले. मातीशी घट्ट वीण जोडला गेलेला नेता अशी त्यांची ओळख होती आणि म्हणूनच त्यांच्या जाण्यानंतर अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत.
पेनूर हे त्यांचे मूळ गाव आणि सांगोला ही त्यांची कर्मभूमी झाली. पेनूर येथून अनेक मुली शाळेसाठी मोहोळ येथे रोज एसटी बसने जात असत. त्या काळात मुलींचीही संख्या जास्त होती. मात्र पंढरपूर येथून येणारी एसटी बस पेनूरला थांबत नसल्याने मुलींना शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत. हाच त्रास लक्षात घेऊन 2017 मध्ये प्रेरणा या बारावीत शिकणाऱ्या मुलीने आबासाहेबांना पत्र लिहून परिस्थिती सांगत एसटी बस थांबवण्यासाठी विनंती केली. मात्र त्या काळात गणपतराव हे नागपूर अधिवेशनाला गेले असल्याने त्यांना ते पत्र मिळू शकले नाही. यानंतर जसजशी परीक्षा जवळ येऊ लागली तसे प्रेरणा गवळी हिने 30 डिसेंबर 2017 रोजी दुसरे पत्र आबांना लिहिले. हे पत्र मिळताच 9 जानेवारी 2018 रोजी गणपतराव यांनी तातडीने पंढरपूर आगर प्रमुखाला फोन करून पेनूर येथे बस थांबवण्याबाबत सूचना दिल्या. एवढ्यावर न थांबता 10 जानेवारी रोजी स्वतः गणपतराव पहाटे साडेपाच वाजता पेनूर येथे बस थांबते का हे पाहण्यासाठी येऊन उभे राहिले.
पाहा व्हिडीओ : Sangola : दिवंगत गणपतरावांच्या पत्रानंतर पेनूरला बस थांबू लागली आणि प्रेरणा डॅाक्टर झाली!
यावेळी बससाठी थांबलेल्या प्रेरणा आणि इतर मुलींनाही आश्चर्य वाटले आणि गणपतराव स्वतः आलेले पाहून त्या दिवसापासून बस थांबायला सुरुवात झाली. प्रेरणासह इतर मुली वेळेवर मोहोळ येथील नेताजी प्रशालेत पोहचू लागल्या. बस नियमित थांबू लागल्याने या मुलींना चांगलाच फायदा झाला आणि आज प्रेरणा गवळी ही ग्रामीण भागातील मुलगी आज मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात पोहचू शकली. अशा अनेकांच्या आयुष्यात आबा थेट जोडले गेले होते आणि सहजरीतीने त्यांनी केलेल्या कामांमुळे हजारो लोकांच्या आयुष्याला दिशा मिळाली होती. गणपतराव यांच्या निधनानंतर कर्नाटकात मेडिकलचे शिक्षण घेत असलेल्या प्रेरणा गवळीला मोठाच धक्का बसला आणि तिने तिच्या भावना ABP माझाकडे पाठवल्या. अशाच भावना प्रेरणांचे वडील विष्णू आणि आई जयंती यांच्या होत्या. आज आबा जरी नसले तरी हजारोंच्या यशामागे आबांचे अदृश्य हात होते म्हणून त्यांना जीवनात अडचणींवर मात करून पुढे जाता आले .
संबंधित बातम्या :