गणपतराव देशमुख अर्थात आबासाहेब गेले. मात्र, जाण्याआधी अनेक विक्रम आपल्या नावावर करून गेले. मंत्रालयात रिपोर्टर असताना विधिमंडळाची काही अधिवेशनं कव्हर करायला मिळाली. अधिवेशनात किंवा एकूणच राजकारणात आणि राज्यात कोणतंही सरकार असो त्यामध्ये काही नेत्यांचा दरारा असतो, काहींची भीती असते काहींचा आदर असतो. मात्र, गणपत आबांची मात्र एक वेगळीच आदरयुक्त भीती असायची.
आबा या नावानं त्यांची खास ओळख होती. काखेत फायलींचं बंडल घेऊन आबा फिरत असायचे. कामकाज चालू असल्यावर पूर्णवेळ ते तिथंच असायचे. 'विधिमंडळाचे विद्यापीठ' असंही काही लोक त्यांना संबोधायचे, यात काही खोटं नसावंच. कारण दिग्गज नेतेमंडळी काहीही जुना संदर्भ हवा असेल तर आबांकडे जायचे आणि आबाही तेवढ्याच आपुलकीने एखादी गोष्ट समजून सांगायचे.
विधिमंडळाच्या कामकाजातही एखाद्या विषयावर खल सुरू असेल किंवा वादाचा विषय असेल तर बोलण्यासाठी किंवा मत मांडण्यासाठी सदस्य मंडळी गोंधळ करायचे. मात्र, अशावेळी कितीही गोंधळ सुरू असला आणि आबा बोलायला उभे राहिले की सभागृह शांत होऊन त्यांचं ऐकायचं. आबा उभे राहताच दोन्हीकडील मंडळी 'आबांना बोलू द्या' असं म्हणत शांत राहायची. अगदी शांतपणे आबा आपला मुद्दा मांडायचे, चर्चा करायचे. आबांच्या एवढा असा रिस्पेक्ट कदाचितच कुणाला मिळत असेल.
1962 ला आबांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढवली. सुरूवातीपासून गणपत देशमुख शेतकरी कामगार पक्ष हाच त्यांचा श्वास. शेकापचा गढ आबांनी कित्येक वर्षे अबाधित ठेवला. आबा मंत्रीही झाले. मात्र, त्यांचा साधेपणा कायम अबाधित राहिला. कित्येकदा आबांच्या 'एसटीने प्रवासाच्या' बातम्या यायच्या. आता एसटी महामंडळाने आमदारांसाठी राखीव सीट रद्द केले तरी हरकत नाही. कारण एसटीने प्रवास करणारा आमदार गेलाय, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आज साधा नगरसेवक मनुष्य असला तरी तो कित्येक पिढ्यांची माया उभारून ठेवतो किंवा त्यांचं सामाजिक वावरणं पाहिल्यावर डोळे अचंबित होतात. मात्र, 50 हुन अधिक वर्ष आमदार राहिलेले आबा आपला साधेपणा आपल्या सोबतच घेऊन गेले.
अधिवेशनात आबांच्या विधिमंडळातील 50 पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष प्रस्ताव आणला होता. यावेळी काही पत्रकरांसोबत मीही रात्री 1 ते दीड वाजेपर्यंत चर्चा ऐकली होती. सर्वपक्षीय नेतेमंडळी आबांच्या विषयी भरभरून बोलत होते. गणपत आबा हे राजकारणातील भीष्म पितामह आहेत असं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. देशामध्ये सर्वाधिक वेळा निवडून येण्याचे रेकॉर्ड करणारे गणपतराव देशमुख अर्थात आबासाहेब हे सर्व सदस्यांसाठी आदराचे आणि प्रेरणेचे स्रोत होते. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी नेहमीच त्यांना यशोशिखरावर घेऊन गेली. 51 वर्ष विरोधी पक्षात काम करून एक अनोखी चळवळ त्यांनी उभी केली. शेतीप्रश्न आणि पाणीप्रश्न असला की त्यांच्याकडून कित्येकदा माहितीचा खजिना मिळतो. त्यांच्याकडून मला खुप शिकायला मिळाले असून सुवर्णअक्षरांनी लिहावी अशी त्यांची कारकीर्द असल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते.
आबासाहेबांची भाषण ही ज्ञानाचा खजिना होती. उतारवयातही त्यांचा उत्साह कायम होता. सभागृहात कामकाजात पूर्णवेळ उपस्थिती, तेवढ्याच उत्साहाने कामकाजात सहभाग ते घ्यायचे. राजकीय संन्यास घेतल्यानंतरही त्यांची कामं कमी झाली नाहीत. कोविड काळातही कमालीचे सक्रीय होते. आबांची विचारसरणी डावी आणि वागणूक ही गांधीवादी होती. अशा या मातीतल्या माणसाचं जाणं खरोखर चटका लावून जाणारं आहे. आज महाराष्ट्रानं राजकारणातला भीष्म पितामह गमावलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही...
आबांना भावपूर्ण आदरांजली...