गावात बसचा थांबा करावा, अशी मागणी एका विद्यार्थिनीने आमदार गणपतराव देशमुखांकडे केली होती. त्याचा पाठपुरावा करत देशमुखांनी बस थांबा करुन घेतला आणि संबंधित विद्यार्थिनीला पत्र पाठवलं. इतकंच नाही, तर बस थांबवली नाही तर फोन करुन कळव, असंही तिला सांगितलं.
मोहोळ तालुक्यातील पेनूरमध्ये राहणाऱ्या प्रेरणा विष्णू गवळीने मोहोळला कॉलेजला जाण्यासाठी गावात बस थांबत नसल्याबद्दल पत्र लिहिलं होतं. मोहोळला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बसमध्ये जास्त गर्दी होते. तसंच काही विद्यार्थ्यांना जागाही मिळत नाही. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होतं, अशा आशयाचे पत्र तिने लिहिलं होतं. याबाबत पाठपुरावा करुन सकाळी सात ते 8.15 वाजताच्या दरम्यान दुसऱ्या बसला थांबा करण्याची विनंती केली होती.
या पत्राची दखल घेत गणपतराव देशमुखांनी पंढरपूर आगारप्रमुखांना फोन केला आणि दुसऱ्या बसला थांबा देण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पेनूरला पंढरपूर-सोलापूर बस सकाळी आठ वाजता थांबणार आहे, असं आमदारांनी पत्राद्वारे प्रेरणाला कळवलं. विद्यार्थिनीने पत्र पाठवलं तेव्हा आपण अधिवेशनासाठी नागपुरात होतो, दुसरं पत्र मिळाल्यानंतर आगारप्रमुखांशी बोलून निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं.