Railway : भारतीय रेल्वेत जसे प्लॅटफॉर्म, स्टेशन, रेल्वेचे डबे आणि इंजिन महत्त्वाचे आहे. तसाच भारतीय रेल्वेचा अविभाज्य भाग आहे हमाल. वर्षानुवर्षे आपण या हमालांना स्टेशनवर बघत आहोत. मात्र मध्य रेल्वेच्या एका निर्णयामुळे हे हमाल नामशेष होतील की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


हमाल, कधी कौतुक तर कधी दुर्लक्षित असा भारतीय रेल्वेचा अविभाज्य भाग. इतका अविभाज्य की त्यावर अनेक सिनेमे तयार केले गेले आहेत. महानायक अमिताभ बच्चनच्या करिअर मधला सर्वात यशस्वी सिनेमा पण हमालाच्या भूमिकेतला होता. पण ते म्हणतात ना प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार येतात... हमालांचं पण तेच झालं आहे. एके काळी ज्यांच्या शिवाय प्रवासी स्टेशनवर जाण्याचा विचार पण करू शकत नव्हते तेच आज नामशेष होतील की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. याला कारणीभूत आहे मध्य रेल्वेचा एक निर्णय.


मध्य रेल्वेने काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात एक जाहिरात दिली. यात ऍप बेस्ड ट्रॉली सुविधा देण्यासाठी निविदा मागवण्यात आल्यात. ही ट्रॉली तुम्हाला स्टेशनवर उपलब्ध करून देण्यात येईल, त्यावर आपल्याकडील सामान टाकून स्वतःच आपण ट्रेन पर्यंत नाहीतर ट्रेन पासून स्टेशन बाहेर पर्यंत नेता येईल. त्यासाठी काही पैसे देखील आकारण्यात येतील. 


ही ट्रॉली प्रवाश्यांना ऍप वर बुक करता येईल किंवा स्टेशनवर थेट जाऊन बुक करता येईल. पुढील 5 वर्षांसाठी हे कंत्राट असेल, आणि त्याच कंत्राटदाराला ऍप देखील डेव्हलप करावे लागेल. पण या ट्रॉली सिस्टीम मुळे वर्षानुवर्षे रेल्वेत काम करणाऱ्या हमालाच्या पोटावर पाय येण्याची शक्यता आहे.   


या हमालांच्या अनेक पिढ्या रेल्वेला अतिशय तुटपुंज्या मिळकतीवर सेवा देत आहेत. एका प्रवाश्याचे सामान उचलायला त्यांना फक्त 50 ते 100 रुपये मिळतात. तर दिवसाचे जास्तीत जास्त 200 ते 250 रुपये मिळतात. ते देखील मिळतीलच असे नाही. त्यात कोरोना काळात सर्व रेल्वे बंद असताना त्यांच्या कडे रेल्वे प्रशासनाने काय तर कोणीच ढुंकून देखील बघितले नव्हते. दीड वर्षाने जेव्हा आता रेल्वे पूर्वपदावर येत आहे तेव्हा महागाईने त्यांचे जीणे हराम केले आहे. अशात असे निर्णय घेण्याआधी त्यांना विचारात पण घेण्यात आले नाही. 


ॲप्स बेस्ट ट्रॉलीच्या निर्णयाबद्दल मध्य रेल्वेने सध्या तरी सावध पावले टाकण्याचे ठरवले दिसत आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितल्याप्रमाणे, आठ तारखेला या टेंडरच्या निविदा खुल्या करण्यात येणार आहेत, त्यावेळी एक कंत्राटदार नेमून आम्ही प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा देणार आहोत. मात्र ट्रॉली जरी आल्या तरी हमाल कर्मचाऱ्यांचा देखील विचार केला जाईल असे मध्य रेल्वेने सांगितले आहे.


दुसरीकडे रेल्वेच्या प्रवाशांना देखील मध्य रेल्वेच्या हा निर्णय मान्य नाही. वेळोवेळी मदतीस पडणाऱ्या हमालांची आधी व्यवस्था करा मगच ट्रॉली सुविधा द्या असे त्यांचे म्हणणे आहे. 


डिजिटल युग सुरू झाल्यापासून जगातल्या प्रत्येक क्षेत्रातील करोडो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेले आहेत. हमालांना देखील सध्या तीच भीती वाटत आहे. ट्रॉली आल्यानंतर पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवला जाईल याचे टेंशन आत्ताच त्यांना आले आहे. त्यामुळे लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना आणलेला जी आर पुन्हा लागू करावा आणि आम्हाला रेल्वे सेवेमध्ये सामावून घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे.


संबंधित बातम्या


IRCTC : नाताळ आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्यात जाताय? 'या' ट्रेनचे मिळेल कन्फर्म तिकिट!


Mumbai Local : पश्चिम रेल्वेवर आठ नवीन एसी लोकलच्या फेऱ्या, सात गाड्या धीम्या मार्गावर धावणार


Indian Railways First Pod Hotel : भारतीय रेल्वेचे पहिले 'पॉड हॉटेल' मुंबई सेंट्रल स्थानकात सुरु


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha