सांगली : स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम आलेल्या विटा नगरपालिकेचा दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. महिला सफाई कर्मचारी शांताबाई हत्तीकर यांना राष्ट्रपतींकडून हा पुरस्कार स्वीकारण्याचा बहुमान मिळाला. गेल्या 34 वर्षांपासून हत्तीकर हातात झाडू घेऊन विटा शहरात साफसफाईचे काम करतात. या गौरव सोहळ्यावेळी नगराध्यक्ष प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील उपस्थित होते.  विटा नगरपालिकेच्या नागरिकांनी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी हा गौरव एलईडी स्क्रीनवर पाहिले. पुरस्कार मिळताच फटाक्यांची आतषबाजी आणि टाळ्या वाजवत जल्लोष केला. 


संपूर्ण देशभरात राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये विटा शहराचा देशात पहिला क्रमांक आला आहे. तर  स्वच्छ भारत अभियानातंर्गत खानापूर नगरपंचायतने राज्यात प्रथम क्रमांक तर देशात 22 वा क्रमांक पटकावला आहे. तसचं साई बाबांची जन्मभूमी असेलल्या परभणीच्या पाथरी नगर परिषदेने देशातील पश्चिम विभागात पाच कोटी रुपयांचा प्रथम पुरस्कार पटकावला आहे. आज पुरस्कार विजेत्या इतर शहरासोबत विटा पालिकेचा, खानापूर नगरपंचायत, पाथरी नगरपरिषदेचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विज्ञान भवन येथे  गौरव करण्यात आला.


 सांगली जिल्ह्यातील चांगल्या कामांसाठी विटा नगरपालिका ओळखली जाते.  विटा शहर कराड-सोलापूर हायवेवर वसलेले आहे. गेल्यावर्षी  विटा नगरपालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणात देशात चौथा क्रमांक मिळाला होता. यंदा मात्र या नगरपालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणात पहिला क्रमांक मिळाला आहे.


स्वच्छतेत देशभर  चमकदार कामगिरी केलेल्या  विटा नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानत अभिनव उपक्रम राबवत या उपक्रमात सातत्य ठेवत कचरा कुंडी मुक्त शहराची संकल्पना राबवली.  सुका,  ओल्या कचऱ्याचे विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया केली.  त्यापासून वीज आणि विविध उत्पादने हरित,  सेंद्रिय खताची निर्मिती केली. शहरात स्वच्छतेचे संदेश देणारे फलक लावून शहर सुशोभिकरणावर भर दिला आहे. विटा नगरपालिकेच्या बारा घंटागाड्यामधून एकत्रित केलेला कचरा विटा नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पभूमी येथे आणला जातो.  ओला कचरा बारीक करून त्याद्वारे कंपोस्ट खत तयार केले जाते.  हे खत नगरपालिका नगरपालिकेच्या बाग-बगीचे वृक्ष यांच्या साठी वापरले जाते तसेच चार रुपये प्रति किलो दराने त्याची विक्री देखील केली जाते.तसेच बायोगॅस द्वारे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून वीजनिर्मिती देखील केली जाते. 


सुक्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक पेपर,  रबर बॅग,  मेटल असे वर्गीकरण करून त्याची साठवण केली जाते. नगरपालिकेने सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापनासाठी खाजगी भागिदारामार्फत बरोबर करार केला आहे. त्याद्वारे प्लॅस्टिक रिसायकलिंगसाठी पुढे पाठवले जाते. घंटागाडीमध्ये जमा केला जाणारा घरगुती घातक कचरा याची  विल्हेवाट यंत्राद्वारे केली जाते.  तसेच जैव वैद्यकीय कचरा याचेदेखील खाजगी भागीदारीमार्फत करार करून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.


पाहा विटा शहराचा Ground Report