औरंगाबाद : औरंगाबादजवळ असलेल्या जटवाडा भागातील शरद पवार दिव्यांग मुलांच्या शाळेतील एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. दिव्यांग मुली- मुलांना चक्क नग्नावस्थेत एकत्र आंघोळ घातली असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी औरंगाबाद शहरातीलहर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
औरंगाबाद जटवाडा रोडवर शरदचंद्र दिव्यांग मुलांची निवासी शाळा आहे. या शाळेतील एक व्हिडिओ घृणास्पद आहे की जो आपण पाहू ही शकत नाही. मुला-मुलींना नग्नावस्थेत आंघोळ घातली जातेय. या शाळेत 1 ते 17 वयोगटातील 35 ते 40 विद्यार्थी आहेत. जे या शाळेत निवासी राहतात.मात्र त्यांच्या हक्कांची पूर्ण पायमल्ली करीत इथले केअर टेकर करत आहेत. हा प्रकार समोर आला तो समाजकल्याण निरीक्षकांच्या अचानक दिलेल्या भेटी मधून ही गंभीर बाब समोर आली आहे.याबाबत हा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने केअरटेकरला विचारले असता केअरटेकरने रोज याच पद्धतीने अंघोळ घातले जात असल्याची कबुली दिली आहे. हा व्हिडिओ 13 मार्च 2020 ला बनवण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू होती आणि आता समाज कल्याण निरीक्षक यांच्या तक्रारीनंतर शाळेच्या मुख्याध्यापकासह व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 13 आरोपींवर दिव्यांग व्यक्ती हक्कभंग अधिनियम 2016 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाच्या भरमसाठ अनुदानावर हे संस्थाचालक शाळा चालवतात आणि दुसरीकडे हे असे निंदनीय प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे या संस्थेवर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र शरदचंद्र पवार यांच्या नावाने सुरू असलेल्या या शाळेवर राष्ट्रवादीकडे असलेल्या समाजकल्याण खाते कारवाई करणार का प्रश्न आहे.
13 मार्च रोजी मी सकाळी साडेआठच्या दरम्यान या शाळेला अचानक भेट देण्यासाठी गेले , त्यावेळेस हा सगळा प्रकार समोर आला. याचे मी पुरावे एकत्र केले, वरिष्ठांना कळवलं, वरिष्ठांनी हे प्रकरण खात्याच्या सचिव पर्यंत पोहोचवलं. या सगळ्यांची चौकशी झाल्यानंतर वरिष्ठांकडून मला सूचना देण्यात आल्या की, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात यावी. वरिष्ठांच्या सूचनेनुसार मी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाल्याचं समाज कल्याण निरीक्षक एस.डी. साळुंके यांनी एबीपी माझाला सांगीतले.
हर्सूल पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी पांडुरंग भागीले म्हणाले, समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना एक तक्रार हर्सूल पोलीस ठाण्यांमध्ये दिली आहे. या तक्रारीवरून शरदचंद्र पवार दिव्यांग मुलांच्या निवासी शाळेच्या संस्थाचालकांसह तेरा व्यक्तींवर आम्ही गुन्हे दाखल केले आहेत आणि पुढील तपास करत आहोत.
शाळेचे संस्थाचलक बादशहा पटेल म्हणाले, औरंगाबाद मधील गतिमंद मुलांमुलींना एकत्रित नग्न अवस्थेत अंघोळ घालतानाच्या व्हायरल व्हिडीओचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित शाळेच्या संस्थाचालकांनी आपले स्पष्टीकरणं देत, हे संस्थे विरोधातील षडयंत्र असून,आपण एका अधिकाऱ्याला सस्पेंड केल्याचा राग मनात धरून पूर्व वैमनस्याने हा व्हिडीओ काढून व्हायरल केल्याचे म्हटलं आहे.