नाशिक : 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अखेर जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. नारळीकर यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा आज नाशिकमध्ये करण्यात आली. साहित्य महामंडळाचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिक ठाले पाटील यांनी याबाबत घोषणा केली. 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये 26, 27, 28 मार्चला होणार आहे. या साहित्य समंलेनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत होती, मात्र अखेर जयंत नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.


यावेळी कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, नारळीकर यांच्या पत्नी मंगलाताईंनी काही प्रश्न उपस्थित केले होते.  त्यामुळे बैठकीला वेळ लागला आणि त्यावर सविस्तर चर्चा झाली.  नारळीकर सरांनी इथे प्रत्यक्षपणे उपस्थित रहावे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, संमेलनाचे उद्घाटन हे लेखक किंवा लेखिकच करतील. राजकीय व्यक्ती करणार नाहीत.  संमेलनाला राजकीय व्यक्ती वर्ज्य नाही, संमेलनाला ते येऊ शकतात, असं ते म्हणाले. कोरोनाच्या काळात नाशिककरांनी खूप मोठी जोखिम पत्करली आहे.  सर्व नियम पाळण्याचे आम्ही प्रयत्न करू, असंही ते म्हणाले.


नारळीकर यांच्या रुपाने पहिल्यांदाच विज्ञान लेखकाला साहित्य संमेलानाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. साहित्य महामंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आज जवळपास तीन तास पार पडलेल्या बैठकीत नारळीकरांच्या नावावर अखेर एकमत झाले. साहित्य मंडळ अध्यक्ष कौतिक ठाले पाटील, मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या सह इतर पदाधिकारी बैठकीला हजर होते. अध्यक्षपदासाठी होती जोरदार रस्सीखेच होती. अध्यक्षपदासाठी 9 दावेदारांच्या नावाची चर्चा होती. साहित्यिक भारत सासणे, जयंत नारळीकर, रामचंद्र देखणे, जनार्दन वाघमारे, तारा भवाळकर, अनिल अवचट, रवींद्र शोभणे, मनोहर शहाणे, गणेश देवी यांची नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होती.



यंदाचं अभा मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये; कौतिकराव ठाले पाटील यांची घोषणा, दिल्लीची संधी हुकली


कोरोनामुळे यावर्षीचं साहित्य संमेलन होणार की नाही, झालं तरी कुठे आणि कसं होणार याविषयी अनेक चर्चा होत्या. कोरोनाचं संकट येण्यापूर्वीच परभणी जिल्ह्यातील सेलू, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, नाशिक आणि पुण्याच्या सरहद संस्थेकडून राजधानी नवी दिल्लीत संमेलन घेण्याविषयीचे प्रस्ताव महामंडळाकडे आले होते. नंतर नाशिकमध्ये यावर्षीचं साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिकच्या लोकहितवादी संस्थेकडे साहित्य संमेलनाचं आयोजकत्व देण्यात आलं आहे.