8th July In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. आजचा दिवसही इतिहास आणि राजकारणासाठी महत्त्वाचा आहे. मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. साहित्यिक गो.नी. दांडेकर यांचा जन्मही आजच झाला. त्याशिवाय भारतीय राजकारणात आपली छाप सोडणारे कम्युनिस्ट नेते ज्योती बसू यांची जयंती आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा वाढदिवस आज आहे. 



1789: मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचा जन्म


जेम्स ग्रॅंट डफ हा एक ब्रिटिश सैनिक आणि स्कॉटिशवंशीय इतिहासकार होता. ग्रॅंट डफ याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या स्थापनेपासून पेशवाईच्या अंतापर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहिला. म्हणून त्याला मराठ्यांचा आद्य इतिहासकार असेही म्हणतात. 


1806 मध्ये ग्रॅंट डफ मुंबईत उतरला. त्याने मुंबईच्या लष्करात कॅडेट (सैन्य प्रशिक्षणार्थी) म्हणून प्रवेश मिळवला व एप्रिल 1807 मध्ये तो लष्कराच्या सेवेत दाखल झाला. 1808 मध्ये काठेवाडमधील लुटारुंच्या 'मालिया' किल्ल्यावर इंग्रज सैन्याने हल्ला केला. या हल्ल्यात ग्रॅंट डफने शौर्य दाखवले. 1810 मध्ये त्याची 'लेफ्टनंट' पदावर पदोन्नती झाली. त्याने फार्सी भाषा आत्मसात केली. त्यामुळे इंग्रज पलटणीचा (बटालियन) फार्सी दुभाषी म्हणून तो निवडला गेला. 


1914: पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री, कम्युनिस्ट नेते ज्योती बसू यांचा जन्म


ज्योती बसू मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. त्यांनी इसवी सन 1977 ते 2000 पर्यंत पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहून भारतातील सर्वांत जास्त वेळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा विक्रम केला आहे. त्याशिवाय,  1964 ते 2008 पर्यंत सीपीएम पॉलिट ब्यूरोचे सदस्य होते. 


पक्की वैचारिक बैठक, सातत्याने 23 वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद सांभाळताना शेतकरी-श्रमिकांच्या भल्यासाठी हाती घेतलेल्या अनेक योजना, राष्ट्रीय रंगमंचावर बजावलेली महत्त्वाची भूमिका, केंदातील आघाड्यांची गणिते मांडण्याची व सोडवण्याची कुशलता, पक्षाचा आदेश मान्य करत पंतप्रधानपद न स्वीकारण्याचा निर्णय आदी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीदीर्ची वैशिष्ट्ये सांगता येतील. ज्योती बसू हे स्वातंत्र्यापूर्वी पासून कम्युनिस्ट चळवळीत आणि स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते. 


1977 मध्ये सत्तेवर येताच बसूंनी जमीन सुधारणेवर लक्ष दिले. 'ऑपरेशन बरगा'द्वारे हिश्शांवर शेती करणाऱ्या दहा लाख लोकांना त्यांनी जमिनीचा हक्क मिळवून दिला. याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांची सहानभूती मिळवण्यात झाला. जमिनीच्या फेरवाटपाचा मोठा फायदा भूमीहिनांना झाला. ग्रामीण भागातील लोकांची आथिर्क स्थिती सुधारावी, यासाठी बसू यांच्या नेतृ्त्वातील डाव्या आघाडीच्या सरकारने अनेक योजना राबवल्या. दारिद्य रेषेखाली असलेल्यांचे प्रमाण वीस वर्षांत 52.2 टक्क्यांवरून 27.6 टक्क्यांवर आले. पंचायत व्यवस्था मजबूत करण्याचे तिसरे महत्त्वाचे काम त्यांनी केले. गावांचे संपूर्ण विकास कार्य पंचायतींमार्फत होऊ लागले. पंचायत व्यवस्था मजबूत केल्याने बंगालमधील ग्रामीण भागात माकपला आपलं जाळ घट्ट करता आलं. 


1996 मध्ये केंद्रात संयुक्त मोर्चाचे सरकार असताना ज्योती बसू यांना पंतप्रधानपदासाठी आग्रह करण्यात आला होता. ज्योती बसू यांच्या नावावर इतर पक्षांचीदेखील सहमती होती. मात्र, आघाडीत असूनही पुरेसं खासदारांचे पाठबळ नसल्याच्या कारणाने माकपच्या केंद्रीय समितीने पंतप्रधान पद स्वीकारू नये असा निर्णय घेतला. पक्षाच्या निर्णयाचा आदर करत ज्योती बसू यांनी पंतप्रधान पद नाकारले. 



1916: कादंबरीकार गो.नी. दांडेकर यांचा जन्मदिन


गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते.  कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले. गो.नी.दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा 115 कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक ’गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे. 


संत ज्ञानेश्वरांच्या सातव्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी सर्वप्रथम 'मोगरा फुलला' या कादंबरीचे अभिवाचन केले होते. यामध्ये त्यांची कन्या डॉ. वीणा देव, जावई डॉ. विजय देव हे सहभागी झाले होते. कादंबरीतील कथानाट्य वाचनातून लोकांपुढे उभे करण्याच्या या अभिनव प्रयोगाचे त्या वेळी सर्वत्र स्वागत झाले होते. यानंतर गोनीदांच्या कुटुंबीयांनी या अभिवाचनाची एक चळवळच उभी केली. 'गोनीदा' यांना साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. 


1922: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचा जन्म


भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीने सहभाग घेणाऱ्या आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील रणरागिनी अशी ओळख असलेल्या कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड अहिल्याताई रांगणेकर यांचा आज जन्मदिन. 1943 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर अहिल्याताईंनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. सुधारणावादी कुटुंबात जन्मलेल्या अहिल्याताईंना घरच्यांकडून पूर्ण पाठिंबा होता. त्यांचे मोठे भाऊ बी.टी.रणदिवे यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. बी.टी. रणदिवे हे भारतातील कम्युनिस्ट, कामगार चळवळीतील मोठे नेते होते. तेदेखील स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. 


स्वातंत्र्य चळवळ जोरात असताना त्यातला महिलांचा सहभाग वाढला पाहिजे हे लक्षात घेतअहिल्याताई रांगणेकरांनी परळ महिला संघाची सुरुवात केली. यात बहुतेक सगळ्या कामगार वर्गातल्या महिला होत्या. 1946 मध्ये नाविकांचा उठाव झाल्यानंतर कम्युनिस्ट पक्षाने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी कामगारांनी संप पुकारला होता. उपाशीपोटी लढणाऱ्या कामगारांना अन्न पुरवण्यासाठी आपल्या भगिनींसह अहिल्याताई जिवाची पर्वा न करता रणात उतरल्या.  परळच्या पुलाजवळ झालेल्या गोळीबारात त्यांच्या सहकारी, कम्युनिस्ट कार्यकर्त्या कमल दोंदे धारातीर्थी पडल्या. बहीण कमल रणदिवे यांच्या पायाला गोळी लागली. या हल्ल्यात 24 वर्षीय अहिल्याताई रांगणेकर थोडक्यात बचावल्या. 


संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांचं मोठं योगदान होतं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सेनापती बापट यांच्यावर पोलिसांनी केलेला लाठी हल्ला अहिल्याताईंनी आपल्या अंगावर घेतला. या हल्ल्यात त्यांचा डोळा थोडक्यात बचावला. मात्र, त्यांची एका डोळ्याची दृष्टी कमी झाली होती. या घटनेनंतर आचार्य अत्रे यांनी त्यांच्यावर कविता लिहित रणरागिनी अहिल्या अशी उपाधी दिली. 


समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्यासोबत महागाई प्रतिकार महिला समितीच्या माध्यमातून त्यांनी लाटणे मोर्चा काढून महागाईकडे सरकारचं लक्ष वेधलं. महागाईच्या मुद्यावरून त्यांनी त्या काळच्या मंत्र्यांना सळो की पळो करून सोडलं. स्त्रीमुक्ती चळवळीतही अहिल्याताई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिंदू कोड बिलाचे त्यांनी समर्थन केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभेच्या ठिकाणी येणाऱ्या उजव्या विचारांच्या कार्यकर्त्यांना अहिल्याताई आणि महिलांनी पिटाळून लावले होते. देशातील महिला संघटना अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या संस्थापक नेत्या होत्या. आणीबाणीमध्ये त्या भूमिगत होत्या. पुढे 1977 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या खासदार म्हणून निवडून गेल्या. त्याआधी त्या मुंबई महापालिकेत नगरसेविका होत्या. अहिल्याताई रांगणेकर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्याशिवाय, माकपच्या केंद्रीय समितीवर अनेक वर्ष होत्या. 


1972: भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याचा जन्म 


भारतीय क्रिकेट संघाला विजयाची सवय लावणारा आणि संघात आक्रमकता भिनवणारा कर्णधार  सौरव गांगुली याचा आज जन्मदिन. आपल्या डावखुऱ्या फलंदाजीने सौरवने क्रिकेट रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. गांगुलीने भारताकडून 300 पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळला आहे. असा कामगिरी करणारा हा भारताचा चौथा खेळाडू आहे. वन-डे सामन्यात सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आहेत.  गांगुलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 15 कसोटी शतके आणि 22 एकदिवसीय सामन्यात शतके झळकावली आहेत. एकदिवसीय सामन्यांत 10, 000 धावा काढणारा गांगुली जगातील सातवा तर भारतातला दुसरा फलंदाज आहे.


गांगुलीने 2000-2005 सालांदरम्यान 49 कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले. यांपैकी त्याने 21 सामन्यांत विजय मिळवला. 2003 च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत त्याने संघाचे कर्णधारपद भूषवले होते. या विश्वचषकात भारताने उपविजेतेपद पटाकवले होते. 


इतर महत्त्वाच्या घटना


1497: वास्को द गामा युरोपातून भारताच्या पहिल्या सफरीवर निघाला.
1856: चार्ल्स बर्न यांना मशीनगन चे अमेरिकेतील पेटंट मिळाले.
1910: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली
1954 : साली देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जगातील सर्वात मोठ्या कालव्यावर भाकरा-नांगल जलविद्युत प्रकल्प सुरु केला.
1958: बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आँखे बारह हाथ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.
2006: मुख्यनिवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
2008: महाराष्ट्र भूषण डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन