8th July Headline :  शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. तर शरद पवार हे त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात येवल्यापासून करणार आहेत. येवल्यामध्ये शरद पवार हे सभा घेणार आहेत. तर छगन भुजबळ हे देखील नाशिकमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेलंगणा आणि राजस्थानमधील विविध कार्यक्रमांच्या विकासकामांचे उद्धाटन करणार आहेत. मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने काँग्रेसकडून देशभरात आंदोलनं करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे पुण्यात स्वागत करण्यात येणार आहे. 


शरद पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात होणार


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ येवला इथे फोडण्यात येणार आहे. तर नाशकातल्या येवल्यामध्ये शरद पवारांची सभा होणार आहे. 


छगन भुजबळांचे नाशकात शक्तीप्रदर्शन 


मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच नाशिकमध्ये पोहचणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यलयात भुजबळ भाषण करणार असून नंतर पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. 


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीच्या दौऱ्यावर 


‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर असणार आहेत. तसेच इथे विविध विकास कामांचे देखील लोकार्पण कऱण्यात येणार आहे. 


मनसेची एक सही संतापाची मोहिम


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक सही संतापाची मोहीम राज्यभर राबवली जाणार आहे. दादर भागातून या मोहिमेची सुरुवात करण्यात येणार आहे.


राज्यात मान्सूनचा इशारा


राज्यभरात मान्सूनने दमदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे.  


काँग्रेसची देशव्यापी आंदोलनं


मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. त्यामुळे काँग्रेसकडून देशभरात आंदोलनं करण्यात येणार आहे. तसेच राहुल गांधी यांना  राजकीय कारणांमुळे त्रास दिला जात असला तरी पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे असा संदेश यावेळी पक्षाकडून देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. 


पंतप्रधान मोदी तेलंगणा आणि राजस्थान दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेलंगणा आणि राजस्थानमध्ये विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी पोहचणार आहेत. तसेच यावेळी मुख्यमंत्री केसीआर मात्र उपस्थित राहणार नाहीत.