नांदेड : माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जात-धर्म हा त्याला चिकटलेला असतो. त्यामुळेच राज्यात अनेक ठिकाणी विविध जातींच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी असल्याचं आपण पहिले आहे. पण जातींच्या वेगळ्या स्मशानभूमीप्रमाणे वेगळे पाणवठे असल्याच कधी तुम्ही ऐकलं आहे का? पण नांदेड जिल्ह्यातील एका गावात जातीनिहाय विहिरी आहेत आणि इथले नागरिक आपल्या जातीप्रमाणे विहिरींवर जाऊन पाणी भारतात.


 



 

7 जातींच्या 7 वेगवेगळ्या विहिरी

 

सावरगाव हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील गाव. सुमारे 5 हजार लोकवस्तीच्या या गावात मराठा, बौद्ध, मातंग, लिंगायत, आदिवासी अशा अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. गावात निजामाने एक तलाव बांधला होता, जो आता पूर्ण आटला आहे. त्यामुळे गावात पाणीटंचाई आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने टँकर दिला आहे. पण तो अपुरा पडतो. त्यामुळे इथल्या लोकांना 2 किलोमीटर पायपीट करुन पाणी आणावे लागते.

 

 

तंटा होऊ नये म्हणून....

 

पाणी टंचाई घालवण्यासाठी गावकऱ्यांनी निजामकालीन तलावात विहिरी खोदण्याचा निर्णय घेतला. पण प्रत्येक जातीने आपापली विहीर खोदायची, असा सर्वानुमते निर्णय झाला. प्रत्येक जातीने आपल्या विहिरीसाठी निधी दिला. त्यातून आता 7 विहिरी खोदल्या गेल्या आहेत. ज्या जातीची विहीर, त्याच जातीच्या लोकांनी त्या विहिरीतून पाणी घ्यायचे, असा नियम आहे. तंटे होऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचं गावकरी सांगतात.

 



 

पाणी चोरु नये म्हणून 24 तास पहारा....

 

काही विहिरींना अधिक पाणी आहे, तर काही विहिरींना कमी पाणी आहे. त्यामुळे दुसऱ्या जातीने आपल्या विहिरीतील पाणी चोरु नये, यासाठी प्रत्येक जातीने आपल्या विहिरींवर पहारा ठेवला आहे. ज्या जातीची विहीर आहे, त्या जातीची 2 माणसे त्या विहिरीवर 24 तास पहारा देतात.

 

दुष्काळातही जातीच्या भिंती कोसळत नाहीत?

 

दुष्काळात अनेक गावातील जातींच्या भिंती कोसळल्या आहेत. सांगलीकरांनी लातूरकारांना पाणी देताना जाती धर्माचा विचार अजिबात केला नाही. सरकारही तसा विचार करत नाही. पण नांदेड जिल्ह्यातील सावरगाव मात्र याला अपवाद ठरतं आहे. कदाचित संपूर्ण राज्यात जातीनिहाय विहीर असलेल, हे एकमेव गाव असावं.

 

दुष्काळात पाणी आटलं, पण माणुसकीचा झरा जिवंत ठेवायला हवा. पण तंटा नकोच्या भूमिकेतून वेगळ्या विहिरी खोदणाऱ्या सावरगाव वासियांना हे कुणी सांगाव?