पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा पोलिसांनी अनिकुल मेहमूद शेख व रेजाऊल गुलाब हुसेन या दोन पश्चिम बंगाल येथून आलेल्याकडून 1 लाख 77 हजाराच्या पाचशे व हजाराच्या खोट्या नोटा बाजारात पसरवत असताना अटक केलं आहे.
वाडा न्यायालयाने या दोघांना 13 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वाडा तालुक्यातील कुडूस या ओद्योगिक पट्यात आठवडा बाजारात पाचशे व हजाराच्या नकली नोटा फिरवल्या जात आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून अनिकुल मेहमूद शेख व रेजाऊल गुलाब हुसेन या पश्चिम बंगाल येथील दोघा संशयितांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता, त्यांच्या खिशात 10 हजार 500 रुपये रोख आढळले. तसेच त्यांच्या रूमची तपासणी केल्यानंतर एक हजाराच्या 95 नोटा, तर पाचशेच्या 164 नोटा, असे तब्बल 1 लाख 77 हजारांच्या, पाचशे व हजार रुपयांच्या नकली नोटा त्यांच्या जवळ आढळून आल्या.
या नोटा नक्की आल्या कुठून, कोणी त्या छापल्या व अद्याप कितीजण अशा प्रकारे नकली नोटा पसरवत आहेत, याचा वाडा पोलीस शोध घेत आहेत. सध्या ग्रामीण बाजारपेठेत हजार व पाचशे रुपयाच्या नकली नोटा पसरविण्यासाठी बांगलादेशी मजुरांचा वापर करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.