मुंबई : आजच्याच दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी भारतीय क्रांतिकारी बिपिनचंद्र पाल यांचा झाला होता. शिक्षणशास्त्र, मानस आणि बालमानस  या विषयांचे लेखक भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्म झाला होता. आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचे हुबळी येथे निधन झाले. शास्त्रीय गायक, संगीतकार आणि  शास्त्रीय संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे निधन झाले होते. 


1858 : स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचा जन्म


बिपिनचंद्र पाल  हे लाल-बाल-पाल त्रयीतील एक स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर, 1858 रोजी पाईल या गावी झाला. त्याचे वडील रामचंद्रपाल हे पेशकार असून ते प्रखर देशभक्त व विशुद्ध चरित्राचे होते. ते स्वतः सनातनी असून मुलांनी पाश्चिमात्य शिक्षण शिकावे असे त्यांना वाटत होते. 1879 मध्ये शिक्षण पूर्ण होताच काही काळ त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. ब्राम्होसमाजाचे केशवचंद्र सेन यांच्या विचारांची छाप त्यांच्यावर पडली. याशिवाय पी. के. रॉय, आनंदमोहन बोस, द्वारकानाथ गांगुली वगैरे विद्वानांचा प्रभाव त्यांच्यावर होता. सुरुवातीस त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. नंतर त्यांनी 'वंदे मातरम्' हे दैनिक सुरू केले. बिपिनचंद्र हे एक् तत्त्वचिंतक होते. त्यांना देशाची सर्वांगीण तयारी झाल्याशिवाय स्वातंत्र्य नको होते. त्यांची राष्ट्रीयत्वाची कल्पना धर्मभावनांशी निगडित होती. ते होमरुल लीगचे सभासद होते, तसेच काँग्रेसचे निष्ठावन कार्यकर्ते होते. बिपिनचंद्रांनी अनेक वृत्तपत्रे काढली. यातून त्यांनी आपले विविध विषयांवरील विचार मांडले. याशिवाय त्यांनी तत्कालीन थोर व्यक्तींचे चरित्रे लिहिली. पहाडी आवाजाचे वक्ते म्हणून त्यांची ख्याती होती. लाल - बाल- पाल या त्रयीने वंगभंग, स्वदेशी व बहिष्कराचे प्रचंड आंदोलन करून जनजागृती केली.


 1862 : बहादूर शाह जफर यांचा मृत्यू


 बहादूर शाह जफर हे  मुघल सम्राट आणि उर्दू कवी होते.  ते एक नामांकित सम्राट होता, कारण मुघल साम्राज्य केवळ नावापुरतेच अस्तित्वात होते आणि त्यांचा अधिकार फक्त जुन्या दिल्लीच्या तटबंदीपर्यंत मर्यादित होता. 1857 च्या भारतीय बंडखोरीमध्ये त्यांच्या सहभागानंतर , ब्रिटीशांनी त्यांना पदच्युत केले आणि 1858 मध्ये ब्रिटीश-नियंत्रित ब्रह्मदेशातील रंगून येथे अनेक आरोपांवर दोषी ठरवल्यानंतर त्याला निर्वासित केले. 7 नोव्हेंबर 1862 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 


1875: 'वंदे मातरम्'  गीताची बंकिमचंद्र चटर्जींनी रचना केली


वंदे मातरम्  ही 1870 मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी उच्च संस्कृतमय बंगाली भाषेत लिहिलेली एक कविता आहे. त्यांनी ही कविता त्यांच्या 1882 च्या आनंदमठ या बंगाली कादंबरीत समाविष्ट केली होती. ही कविता सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी 1896 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायली होती. ऑगस्ट 1947 मध्ये ब्रिटिश राजवट संपण्यापूर्वी काँग्रेस कार्यकारिणीने ऑक्टोबर 1937 मध्ये या गाण्याचे पहिले दोन कडवी भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले होते. 


 1888 : चंद्रशेखर वेंकटरामन यांचा जन्म


चंद्रशेखर वेंकटरामन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते.1930 मध्ये, प्रकाश विखुरण्यासाठी त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. सी.व्ही. रामन यांचा जन्म तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात 1917-1933 भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन हे काही काळ बंगलोरातही होते, 1947 साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रमणचे 6 मे 1907 रोजी लोकासुंदरी अम्मल बरोबर लग्न झाले होते. त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ-खगोलशास्त्रज्ञ राधाकृष्णन हे दोन पुत्र होते. रमण हे चंद्रशेखर सुब्रह्मण्यन यांचे काका होते. 1983  मध्ये, चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) या शोधासाठी ते ओळखले जातात. 1930 चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन यांना मिळाला होता.


1905 : केशवसुत यांचे निधन


आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचे हुबळी येथे निधन झाले. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात.वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते. सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता आहेत. इंग्रजी काव्य परंपरेतील रोमॅण्टिक समजला जाणारा सौंदर्यवादी दृष्टीकोन प्रथम मराठी साहित्यात आणि काव्यात आणण्याचा मान केशवसुतांकडे जातो. 


1903: शिक्षणशास्त्र, मानस व बालमानस या विषयांचे लेखक भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्मदिवस


शिक्षण व बाल मानसशास्त्र या विषयांवर मराठीत लिहिणारे भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1903 रोजी झाला. बालपणाचे रहस्य, बाल अवलोक, भाषा व्यवसाय, अध्यापन व मानसशास्त्र, शिक्षणविषयक नवे विचार ही त्यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे आहेत.


1998: शास्त्रीय गायक, संगीतकार आणि शास्त्रीय संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे निधन


प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार आणि गायक  गणेश बलवंत नवाथे अर्थात पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे 7 नोव्हेंबर 1998 मध्ये निधन झाले. गोव्यातल्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणाऱ्या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरुवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले. संगीत शिकण्यासाठी त्यांनी 21 गुरू केले. 


सुस्पष्ट उच्चार, लयकारी आणि सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेवून मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायकीची वैशिष्ट्य. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी मराठी रंगभूमीसाठीदेखील योगदान दिले आहे. त्यांनी 17 संगीत नाटकांना संगीत दिले आहे. संगीत दिग्दर्शनात केलेले प्रयोग रसिकांना भावले. अभिषेकींनी जसं स्वतः संगीत दिलं तसं दुसऱ्यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले.


मत्स्यगंधा, लेकुरे उदंड झाली, कटयार काळजात घुसली, बिकट वाट वहिवाट, देणाऱ्याचे हात हजार, तू तर चाफेकळी आदी नाटकांना त्यांनी संगीतबद्ध केले. शौनक अभिषेकी, देवकी पंडित, राजा काळे, प्रभाकर कारेकर, अजित कडकडे, हेमंत पेंडसे, शुभा मुद्गल, महेश काळे आदी त्यांचे शिष्य होते. 


संगीत क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारने 1998 मध्ये पद्मक्षी या नागरी पुरस्काराने सन्मानित केले. त्याशिवाय, नाट्यदर्पण, संगीत नाटक अकादमी, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, मास्टर दिनानाथ स्मृती पुरस्कार, सरस्वती पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला. 


इतर महत्त्वाच्या घडामोडी


1824: डॉ. भाऊ दाजी लाड जन्मदिन.
1665: सर्वात जुने जर्नल लंडन गॅझेट पहिल्यांदा प्रकाशित झाले.
1879: वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.
1917: पहिले महायुद्ध : गाझाच्या तिसर्‍या लढाईत ब्रिटिश फौजांनी गाझा ताब्यात घेतले.
1936: प्रभात चा संत तुकाराम हा चित्रपट पुण्यातील प्रभात चित्र्पटगृहात रिलीज झाला.
1963: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी यांचे निधन.