मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महादेव बेटिंग अॅपवरुन (Mahadev Betting App) भापवर टीकास्र सोडलं. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे भाजपमध्ये सहभागी झाले तर महादेव बेटिंग अॅप हे हर हर महादेव अॅप होईल'. सध्या महादेव बेटिंग अॅप प्रकरणात अनेक मोठे खुलासे ईडीकडून करण्यात येत आहेत. त्यातच यामधील आरोपी शुभम सोनी याने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर 508 कोटी रुपये दिल्याचा आरोप केलाय. पण मुख्यमंत्री बघेल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावेल आहेत. त्यातच आता याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी देखील भाजपवर निशाणा साधलाय.


 छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुकींची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. त्यातच उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलंय. मुख्यमंत्री बघेल यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर त्यांनी देखील यावर भाष्य करत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. 


उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं ? 


'तसं बघायला गेलं तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे भाजपमध्ये कधीही सामील होणार नाहीत, पण जरी ते सामील झाले तर महादेव बेटिंग अॅप हर हर महादेव अॅप बनेल आणि त्यांच्यावरील सर्व खटले मागे घेतले जातील', असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. 


भूपेश बघेल यांनी काय म्हटलं? 


ईडीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार शुभम सोनी हा पहिल्या दिवशी महादेव बेटिंग अॅपमधील एक अधिकारी होता. दुसऱ्या दिवशी तो त्या अॅपचा मालक झाला. हा माणूस त्याच्या नोकराच्या लग्नात 200 कोटी रुपयांचा खर्च करतो. त्याच्या व्हिडिओमध्येही शंका उपस्थित होतील अशा काही घटना आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. 






केंद्र सरकराचं मोठं पाऊल 


अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थातच ईडीच्या  विनंतीवरून केंद्र सरकारने महादेव बेटिंग अॅपवर  बंदी घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने  महादेव बुक अॅपसह 22 बेकायदेशीर बेटिंग अॅप्स आणि वेबसाइट्सच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हे सगळे अॅप्लिकेशन्स बंद करण्यात आले आहेत.  बेकायदेशीर बेटिंग अॅप सिंडिकेटविरोधात ईडीने केलेल्या तपासानंतर आणि छत्तीसगडमधील महादेव बुकवर टाकलेल्या छाप्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये अॅपचे बेकायदेशीर कामकाजही उघड करण्यात आले आहे.


हेही वाचा : 


Mahadev App Banned: केंद्र सरकारचं मोठं पाऊल, महादेव बुक अॅपसह 22 बेटिंग अॅप्लिकेशन्सवर बंदी