पुणे : शरद मोहोळ (Sharad Mohol) प्रकरणात सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. शरद मोहोळ प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतेय. त्यातच आता सात जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच शरद मोहोळच्या हत्येचं कारण अद्यापही समोर येऊ शकले नाही. त्याचा देखील तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. 


पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर हल्ला करणाऱ्या 3 आरोपींपैकी एका आरोपीचं नाव निष्पन्न झालं होतं. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असे या आरोपीचे नाव आहे. पोळेकर याने त्याच्या इतर साथीदारांसह शरद मोहोळ याच्यावर शुक्रवार 5 जानेवारी रोजी पुण्यातील कोथरुड भागात गोळीबार केला. त्यानंतर त्याला सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचवेळी ससून रुग्णालयात देखील दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. 


कोथरुडमध्ये भीतीचं वातावरण 


कोथरुडमधील सुतारदरा या ठिकाणी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरु केली आहे. पूर्ववैमन्यास्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गोळीबार झाल्यानंतर कोथरुड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेय.


गेल्यावर्षी तडीपारची कारवाई


गुंड शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्या प्रकरणात त्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. याप्रकरणात तो जामिनावर बाहेर आला. दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण प्रकरणात त्याला पुन्हा अटक करण्यात आली. जुलै 2022 मध्ये शरद मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. 


कोण होता शरद मोहोळ? (who is Sharad Mohol)


ज्या मुळशी पॅटर्न चित्रपटाने पुण्यातील आणि मुळशी खोऱ्यातील गुन्हेगारीची जगताची ओळख झाली, त्याच मुळशी तालुक्यातील शरद मोहोळ होता. गुंड संदीप मोहोळचा ड्रायव्हर म्हणून शरद मोहोळ काम करत होता. मात्र, याच संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावारुपास आला. शरदचे आई वडिल शेतकरी असून बेताच्या परिस्थितीत मोठा होऊनही गुन्हेगारीकडे वळला होता. 


हेही वाचा : 


Gangster Sharad Mohol Shot Dead : दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप ते 15 गंभीर गुन्ह्यांची नोंद; शरद मोहोळच्या अट्टल 'गुंडगिरी'चा प्रवास कसा झाला?