6th December In History : इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्व असते. इतिहासात घडलेल्या घडामोडींचा भविष्यावरही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. या काही दिवशी झालेल्या घडामोडी इतिहासात जागा मिळवतात. आजचा दिवसही तसाच काहीसा आहे. प्रथमत: आणि अंतिमत: भारतीय असल्याचे सांगणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) आहे. तर, स्वातंत्र्य चळवळीत पत्री सरकार चळवळीचे प्रणेते, स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड नाना सिंह पाटील (Nana Patil) यांचा स्मृतीदिन आहे. आजच्या दिवशी कारसेवकांनी बाबरी मशीद उद्धवस्त (Babri Masjid Demolition) केली. त्यानंतर देशभरात मोठी जातीय दंगल उसळली होती.
1956 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक क्रांतीचे नेतृत्व करणारे प्रमुख योद्धे, अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित अशा बहुआयामी ओळख असणारे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी बाबासाहेब आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला. अस्पृश्यता पाळली जात असताना, सामाजिक विषमतेला तोंड देत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकारही म्हटले जाते.
बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या. तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत काम केले. महाडच्या चवदार सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यता विरोधी लढ्याचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या लढ्याला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी विविध पद्धतीने सहकार्य आणि मदत केली.
बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई विद्यार्थी होते.
भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले होते.
स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा आणि अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश सरकारमध्ये मजूर मंत्री होते. त्यांनी त्या कालावधीत भारतीय कामगारांसाठी अनेक मोलाचे कायदे करून घेतले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप 1928-1934 या कालावधीत चरी (रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप सात वर्ष सुरू होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी सुद्धा संघर्ष केला. 17 सप्टेंबर 1937 रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात मांडले. 10 जानेवारी 1938 रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली 25 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला.
बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता आदी पाक्षिके, वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली होती. त्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांचे प्रश्न उचलून धरले.
अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने 1946 मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय,1950 मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय 1953 मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर 1956 मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याच्या दोन महिन्याच्या आत त्यांचे महापरिनिर्वाण झाले.
1976 : क्रांतिसिंह नाना पाटील यांचे निधन
क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचे राजकीय नेते होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मानले जातात. त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते.
नाना पाटील यांच्या वरती प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता. पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्याय कारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला. साताऱ्यातील प्रतिसरकारच्या स्थापनेत त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले. भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागात ब्रिटिशांचे अस्तित्व नाममात्र राहिले. नाना पाटील यांनी युवकांची संघटना स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले. प्रती सरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले.
1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती.
1920 ते 1942 या काळात नाना 8-10 वेळा तुरुंगात गेले. 1942 ते 46 या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत.
क्रांती सिंह नाना पाटील यांच्यावर र महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात आपले कार्य सुरू ठेवत शोषित, वंचित घटकांचा आवाज बुलंद करत त्यांचे प्रश्न सरकारसमोर मांडले. 1957 मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. 1967 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.
1992 : अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली; उसळलेल्या दंगलीत सुमारे 1500 हून लोक ठार
देशाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक असलेल्या बाबरी मशिदीचा विध्वंस (Babri Masjid Demolition) 6 डिसेंबर 1992 रोजी करण्यात आला. प्रभू श्रीरामाच्या जन्मठिकाणी ही मशीद बांधल्याचा दावा करत कारसेवकांनी बाबरी मशिदीचा विध्वंस केला. या घटनेनंतर देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. राम जन्मभूमीचा वाद अनेक वर्ष सुरू होता. स्वातंत्र्य मिळाल्याच्या काही वर्षातच हा वाद समोर आला होता. संघ परिवारातील संघटना, उजव्या आणि हिंदुत्ववादी विचारांच्या संघटना-राजकीय पक्षांनी या मुद्यावर सातत्याने आक्रमक आंदोलने केली. भाजपचे नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेने देशात बाबरी मशिदीविरोधात वातावरण तापवले. कारसेवा करणार असल्याचे सांगत हिंदुत्ववादी संघटनांनी 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली.
बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर देशात जातीय दंगली उसळल्या. 1993 साली देशात मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊदने बॉम्बस्फोट झाले. देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. ठिकठिकाणी हिंदू-मुस्लिम दंगली उसळल्याचं चित्र होतं.
नंतरच्या काळात या घटनेची चौकशी करण्यासाठी लिबरहान आयोगाची नेमणूक करण्यात आली. या आयागाला तब्बल 48 वेळा मुदतवाढ देण्यात आली. आयोगावर आठ कोटींपेक्षा जास्त खर्च झाल्यावर, दीड दशकांनी म्हणजे 2009 साली अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात भाजपच्या आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या अनेक नेत्यांवर आरोप ठेवण्यात आला. नंतरच्या काळात या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
इतर घटना
1768: एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
1861: कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचा जन्म
1877: द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.
1923: लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचा जन्म
1945: अभितेने शेखर कपूर यांचा जन्म.
1971: भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले