मुंबई :  मुंबई मेट्रोच्या कामासाठी (Mumbai Metro) ड्रिलिंगचे काम सुरु असताना, वेरावली (Veravali) सेवा जलाशयाच्या 1800  मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला हानी पोहोचून गळती लागली. त्याच्या परिणामी मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा खंडीत झाला होता. जवळपास 50 तासांनंतर जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली. जलवाहिनीचे नुकसान केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने कारवाईची पावले उचलली आहेत. मेट्रोचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला सव्वा कोटींच्या दंडाची नोटीस मुंबई महापालिकेने बजावली आहे. 


मेट्रो प्रकल्पाचे ड्रिलिंग काम सुरु असताना या जलवाहिनीला हानी पोहोचून गळती लागली होती. सर्वात महत्वाचे प्राधान्य दुरुस्तीला असल्याने महानगरपालिकेचा जल अभियंता विभाग त्याचप्रमाणे विभाग कार्यालयांची संपूर्ण यंत्रणा दुरुस्ती कार्यवाहीसाठी तैनात होती. सुमारे 50 तासानंतर सोमवारी, 4 डिसेंबर रोजी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह जवळपास 100 हून कर्मचारी, कामगार तळ ठोकून होते. त्यामुळे आव्हानात्मक असणारे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर कंत्राटदाराला दंडाची नोटीस बजावण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. 


मुंबई मेट्रोच्या कंत्राटदाराला कितीचा दंड?


मेट्रो कामामुळे फुटलेल्या जलवाहिनीकरता ईगल इन्फ्रा इंडीया लिमिटेड या कंत्राटदाराला मुंबई महापालिकेकडून एक कोटी 33 लाख 62 हजार 412  रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. 
मेट्रो प्रकल्पाचे ड्रिलिंग काम सुरु असताना या जलवाहिनीला हानी पोहोचून गळती लागली होती.  जलवाहिनीला पोहोचलेले नुकसान, दुरुस्तीसाठी सर्व यंत्रणांनी आपापल्या स्तरावर केलेला खर्च, वाया गेलेल्या पाण्याचा नियमानुसार आकार आणि दंड अशी सर्व मिळून रक्कम एक कोटी 33 लाख 62 हजार 412 रुपये भरण्याबाबतची नोटीस पालिकेनं कंत्राटदारास दिली आहे. 


जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम ठरले अतिशय खडतर आणि आव्हानात्मक


या जलवाहिनीची दुरुस्ती ही एरवीच्या दुरुस्ती कामांपेक्षा वेगळी, अतिशय खडतर आणि आव्हानात्मक होती. ज्या ठिकाणी गळती लागली ती जलवाहिनी जमिनीत सुमारे सहा मीटर खोल आहे. तसेच या परिसरात अलीकडे बांधकाम झाल्यानंतर जमिनीचा भराव पूर्ववत केलेला असल्याने तुलनेने त्याची भूगर्भीय पकड सैल आहे. त्यामुळे अधून मधून ती माती देखील गळती झालेल्या खड्ड्यात कोसळत होती. स्वाभाविकच मुख्य जलवाहिनी पूर्ण रिकामी करण्याच्या दृष्टीने संपूर्ण पाण्याचा उपसा करणे आणि त्याचवेळी दुरुस्तीसाठी खोदकाम केलेल्या ठिकाणी भूस्खलन होऊ न देणे, हे अतिशय मोठे आव्हान पेलून दुरुस्ती पूर्ण करण्यात आली. एवढेच नव्हे तर या जलवाहिनीला वरून नव्हे तर आजूबाजूने आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी छिद्र होऊन गळती लागली होती. त्यामुळे जलवाहिनी पूर्ण रिती करुन आत शिरून ही सर्व छिद्र बंद करावी लागणार होती. मात्र, पाणी पूर्णपणे बाहेर काढणे शक्य होत नसल्याने बाहेरच्या बाजूने ही गळती बंद करण्याचे काम करावे लागले.