6 April In History: आज इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला. तर, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे आंदोलन असणारे मिठाचा सत्याग्रह देखील आज झाला. जाणून घ्या इतिहासातील घडामोडी...
1656 : शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला
छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर उभारण्यात आली. स्वराज्य उभं करण्याचे काम सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या चंद्रकांत मोरे यांचा पराभव करून रायरी किल्ला ताब्यात घेतला. याच किल्ल्याला पुढे रायगड असे नाव देण्यात आले. जावळीचे खोरे हे अतिशय महत्त्वाचे होते. 'येता जावळी जाता गोवली' असे जावळीच्या खोऱ्याबाबत म्हटले जायचे.
एकबाजूला घनदाट झाडी, महाबळेश्वर , प्रतापगड, रायगड सारखे अभेद्य जंगल आणि किल्ले कपारी आणि तिथूनच कोकणात उतरला तर थेट अरबी समुद्र अशी ही जावळी खोऱ्याची रचना आहे. या जावळीच्या खोऱ्यात उतरणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे म्हटले जायचे.
1647 मध्ये माणकाईने दत्तक घेतलेल्या चंद्ररावास शिवाजी महाराजांनी जावळीच्या गादीवर बसण्यात मदत केली होती, ते यासाठीच की या उपकारामुळे जावळीकर मोरे हे आपले मित्र होतील व हिंदवी स्वराज्य-संवर्धनात त्यांच्याकडून सहकार्य प्राप्त होईल. परंतु लवकरच चंद्ररावाने महाराजांशी उघड शत्रुत्व घेतले. महाराजांचे उपकार विसरून या चंद्ररावाने आदिलशाही निष्ठा जाहीर करून महाराजांना शह देण्यास सुरुवात केली. अखेर सामोपचाराने जावळी प्रकरण मिटत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेण्याची योजना आखली. खुद्द शिवाजी महाराजांनी या मोहिमेत सहभाग घेत जावळीवर हल्ला केला. त्यात चंद्रराव मोरे यांना कैद करून नंतर रायगडावर ठेवण्यात आले. नंतर त्यांना मृत्यू दंडाची शिक्षा देण्यात आली.
1917 : मराठी कथाकार आणि कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी यांचा जन्म
हणमंत नरहर जोशी, अर्थात "काव्यतीर्थ" कवी सुधांशु यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे झाला. ते मराठी भाषेतील कवी होते. त्यांनी अनेक मराठी भावगीते लिहिली आहेत. मराठी कवी कवी कुंजविहारी यांनी ह.न. जोश्यांना सुधांशु हे नाव दिले, आणि पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. इ.स.1937 पासून सुधांशु यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कविता किर्लोस्कर, स्त्री, मनोहर इत्यादी मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. कवी सुधांशूंना शंकराचार्यांकडून काव्यतीर्थ ही पदवी मिळाली. भारत सरकारकडून इ.स. 1974 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1930 : महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह
मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा (मोर्चा) साबरमती आश्रमापासून 12 मार्च 1930 रोजी सुरू झाली ती 6 एप्रिल 1930 ला ही यात्रा संपली. गांधीजींच्या बरोबर त्यांचे 78 निवडक अनुयायी होते. त्यात सरोजिनी नायडू, इला भट यांचा समावेश होता. यात्रा पुढे निघाली, तसतशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली. ही यात्रा 24 दिवस चालली आणि तिच्यातील लोक 385 किमी पर्यंत पायी चालले. यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी 6 एप्रिल 1930 ला पोहोचली. महात्मा गांधी यांनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला. तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात हा सत्याग्रह करण्यात आला होता.
1931 : अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा जन्मदिन
किमान तीन दशके आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटासृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा जन्मदिन. सुचित्रा सेन आणि उत्तम कुमार यांनी अभिनय केलेले अनेक बंगाली चित्रपट लोकप्रिय झाले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री आहेत. सात पाके बाँधा (1963) या चित्रपटासाठी त्यांना मॉस्को चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अभिनेत्री मुनमुन सेन या त्यांच्या कन्या आणि मॉडेल-अभिनेत्री रिया सेन या नात आहेत.
1956 : भारताचे माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांचा जन्मदिन
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचा जन्मदिन. 70-80 च्या दशकात टीम इंडियामधील महत्त्वाचे फलंदाज होते. 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे ते सदस्य होते. 1975-76 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस मैदानावर त्यांनी सलग तीन शतके ठोकली आहे. हा विक्रम त्यांच्या नावावर आहे. र 1987 साली झालेल्या विश्वचषकानंतर त्यांनी कपिल देवच्या जागी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. कर्णधार म्हणून त्यांनी आपल्या पहिल्याच मालिकेत 2 शतके ठोकली होती.
1980 : भारतीय जनता पक्षाची स्थापना
1975 साली पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने विरोध केला होता आणि जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. 1977 साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. जनसंघ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होता. तर, जनता पार्टीतील इतर पक्ष हे समाजवादी, मध्यममार्गी विचारांचे होते. दुहेरी पक्ष सदस्यत्व आणि इतर मुद्यांवर जनता पार्टीत फूट पडली. त्यानंतर 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. अटलबिहारी वाजपेयी हे भाजपचे पहिले अध्यक्ष होते.