Sachin Vaze : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माफिचा साक्षीदार बनलेल्या सचिन वाझेची (Sachin Vaze) जेलमधून सुटका करण्याची मागणी मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश एस.एच. गवलानी यांच्यापुढे वाझेच्या या अर्जावर सुनावणी झाली.
सचिन वाझेनं या प्रकरणात माफिचा साक्षीदार होण्याकरता तयारी दर्शवली होती. त्याला सीबीआयनं ना हरकत दिल्यावर कोर्टानंही मान्यता दिलेली आहे. याच पाश्वभूमीवर जर आपण कारागृहात राहिलो तर मग माफिचा साक्षीदार होण्याचा उद्देश नष्ट होऊ शकतो, असा युक्तिवाद वाझेकडून या अर्जाद्वारे कोर्टाकडे करण्यात आला होता. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या अनिल देशमुखांसह त्यांचे निकटवर्तीय संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र आपल्याला अजूनही आरोपीच समजलं जातंय असा दावा वाझेनं या अर्जातून केला होता.
मात्र सचिन वाझेला याप्रकरणी एक आरोपी म्हणून अटक केली होती. त्यामुळे आता जोपर्यंत तो दोषमुक्त किंवा निर्दोष सुटत नाही तोपर्यंत त्याला आरोपीच समजलं जाईल अशी भूमिका घेत सीबीआयनं या अर्जाला केलेल्या विरोध केला होता. जो ग्राह्य धरत विशेष सीबीआय कोर्टानं वाझेचा हा अर्ज फेटाळून लावला.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दरमहा शंभर कोटी रूपयांच्या वसुलीच्या केलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयनं बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेसह संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांनाही अटक केली होती. सचिन वाझे या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनलेला आहे. पालांडे आणि शिंदे यांची सीबीआयनं 16 आणि 17 फेब्रुवारी 2022 रोजी आर्थर रोड कारागृहात जाऊन चौकशी केली होती. त्यांनतर त्यांना अटक दाखवण्यात आली.
आधी NIA कडून अटक, मग सीबीआयकडून बेड्या
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती. तर दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणात मागील वर्षी एप्रिल महिन्यात सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचं सचिन वाझेने तपासादरम्यान सांगितलं होतं.