सातारा : साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. उदयनराजे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. त्याअगोदर उदयनराजे यांनी मोठी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. परंतु या रॅलीमध्ये चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. काही चोरांनी रॅलीत सहभागी झालेल्या लोकांकडील तब्बल 50 तोळे सोने, पैशांची पाकिटं आणि मोबाईल लंपास केले आहेत.

"माझी दहशत आहे म्हणून क्राईम होत नाही, बलात्कार होत नाहीत" असे ठणकावून सांगणाऱ्या साताऱ्याच्या खासदारांना चोरांनी चांगलाच दणका दिला आहे. उदयनराजे भोसले यांच्या रॅलीत चोरट्यांनी सुमारे 50 तोळे सोन्याची चोरी केली आहे. तर अनेकांचे मोबाईल आणि पाकिटं मारल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याप्रकरणी 20 जणांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.

उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यातील गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढली होती. उदयनराजें यांच्या चाहत्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन चोरांची टोळी रॅलीच्या ठिकाणी दबा धरुन बसली होती.

रॅलीदरम्यान चोरांनी लोकांच्या गळ्यातील चेन, खिशातली पाकिटं आणि मोबाईल लंपास केले. आपल्याकडील चेन, पैसे मोबाईल चोरीला गेले असल्याचे लक्षात येताच अनेकांनी रॅली अर्धवट सोडून थेट पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन 20 हून अधिक लोक आले होते.