सोलापूर : सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पेनूर गावात कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या 10 डॉक्टरांसह 47 जणांना हायरिस्कमुळे क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. तसंच रुग्णालयही सील करण्यात आलं आहे. तर गावातील 15 जणांची सोलापुरात तपासणी होणार आहे. दरम्यान महिलेच्या नवजात बाळाचेही स्वॅब आज घेणार असून अहवाल पॉझिटिव्ह आल्यास मुलांचं रुग्णालयही सील होण्याची शक्यता आहे.


संबंधित महिलेला प्रसुतीसाठी पंढरपुरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या दहा डॉक्टरसह इतर वैद्यकीय स्टाफमधील 47 जणांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. तर तिच्या बाळाला तपासणीसाठी सोलापुरात हलवण्यात आलं आहे.


ही महिला सोलापुरातील एका रुग्णालयातून प्रसुतीसाठी पंढरपूरला दाखल झाली होती. 23 एप्रिलला तिला जुळे झाले, मात्र एका बाळाचे वजन कमी असल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान प्रसुतीनंतर तिला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने तिला सोलापुरात हलवण्यात आले. तिचे कोरोनाचे अहवाल काल (26 एप्रिल) आले, ज्यात ती पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं.


यानंतर प्रशासनाने ती महिला पंढपुरातील हॉस्पिटलमधील ज्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आली, अशा 47 जणांना क्वॉरन्टाईन केलं आहे. यामध्ये 10 डॉक्टरांसह 37 इतर वैद्यकीय स्टाफमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सगळ्यांना आता तपासणीसाठी सोलापुरात पाठवले जाणार आहे.


याशिवाय पेनूर गावातील तिच्या गावातील 15 जणांना तपासणीसाठी सोलापुरात दाखल केलं जाणार आहे. तसंच या महिलेच्या नवजात बाळाला रात्री उशिरा सोलापुरात हलवण्यात आलं आहे. सध्या पंढरपुरातील हे नामांकित हॉस्पिटल सील केले असून पेनूर गावही सील करण्यात आलं आहे.


सोलापूरमधील कोरोनाबाधितांची संख्या
सोलापुरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 61 आहे. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 56 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून यातील 54 सोलापूर शहरातील तर दोन जण ग्रामीण म्हणजेच सांगोला आणि मोहोळ तालुक्यातील आहेत.


एकूण कोरोनाबाधित - 61
सोलापूर शहर - 54
सोलापूर ग्रामीण - 2
मृतांची संख्या - 5


Coronavirus Update | सोलापुरात आणखी 11 जणांना कोरोना; एकाचा मृत्यू