ज्या 40 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली नव्हती त्यांचे मे आणि जून महिन्यात मृत्यू झाले आहेत. अश्विनी हॉस्पीटल, कुंभारी, अश्विनी सहकारी रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल), सीएनएस हॉस्पिटल, मार्कंडेय सहकारी रुग्णालय, सिद्धार्थ हॉस्पिटल, यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या रुग्णालयांनी ही माहिती पालिकेपर्यंत पोहोचवलेली नव्हती. त्यामुळे पालिका प्रशासन या रुग्णालयांबाबत काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या सर्व प्रकारामुळे सोलापुरातील कोरोना संदर्भातील आकडेवारी देखील उशिरा जाहीर करण्यात आली. शहरात सोमवारी 27 रुग्णांचे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभरात 17 कोरोनाबाधितांनी डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. त्यामुळे शहरात आतापर्यंत 1957 जण कोरोनाबाधित झाले आहेत. तर सोमवारी मृत्यूचे 3 आणि आयुक्तांनी जाहिर केलेले 40 रुग्णांचे मृ्त्यू समाविष्ट केल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 213 वर पोहोचली आहे. आतापर्यंत शहरात 1059 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर अद्याप 658 रुग्ण उपचार घेत आहेत.
ग्रामीण भागातील देखील सोमवारी 8 रुग्णांची भर पडली. त्यात करमाळा तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. तालुक्यातील झेर येथे ठाणेहून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागीत कोरोनाबाधितांची संख्या 204 वर पोहोचली आहे. त्यापैकी 11 जणांचा आतापर्यंत मृ्त्यू झाला आहे. दिवसभरात ग्रामीण भागातील 11 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने आतापर्यंत 87 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ग्रामीण भागातील 106 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. सोमवारी आढळलेल्या रुग्णांमुळे शहरात 39 आणि अक्कलकोट तालुक्यात 7 तर करमाळ्यात 1 अशी तालुकानिहाय वाढ झाली आहे.