मुंबई : महाराष्ट्रातील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, मात्र लोकांना अजून सावध राहावं लागेल, असं महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी सांगितलं. कोरोना संकटाच्या काळात एबीपी माझाने अजॉय मेहता यांची मुलाखत घेतली. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन परिस्थितीशी महाराष्ट्र कसा सामना करत आहे याविषयी त्यांनी भाष्य केलं. तसंच या परिस्थितीत सर्व राजकीय पक्ष एकत्र कसे काम करत आहेत आणि काय उपाययोजना केल्या जात आहेत याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली.


कोविड-19 परिस्थिती
कोरोना विरुद्धच्या युद्धात महाराष्ट्र सध्या कुठे उभा आहे?
अजॉय मेहता म्हणाले की, "आज परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. लोकांचं सहकार्य मिळतंय, प्रशासन कामाला लागलेलं आहे. यापुढे सावधगिरी बाळगावी लागेल. लोकांना सावध राहावं लागेल आणि प्रशासनाही सतर्क राहावं लागेल. कोरोनाच्या केसेस स्थिर आहेत. वाढ पण नाही, घटही नाही."


सर्वात मोठं आव्हान
कोरोनामुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीत मुख्य सचिव म्हणून सध्या सगळ्यात मोठं आव्हान काय आहे?
कोविड हेच सर्वात मोठं आव्हान आहे. मृत्यूदर कसा कमी ठेवावा यावर सायलेंटली काम सुरु आहे. तसंच खरीप हंगामाची तयारी, खत आणि बियाणं पोहोचवणं, कर्जवाटप करणं हे सध्या मोठं आव्हान असल्याचं मेहता यांनी सांगितलं.


समन्वय
या काळात प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय तज्ञ मंडळी यांच्यात समन्वय साधून प्रभावी उपचार व्यवस्थापन निर्माण करताना काय अनुभव आले?
"या काळात कोणीही मानपानाचा विषय केला नाही. सगळे जण टोप्या आणि चप्पल काढून कामात सहभागी झाले आहेत. अनेक वेळेला तर ज्युनियर डॉक्टर्स नव्या पद्धतींचा शोध लावून कामात पुढाकार घेत आहेत," असं अजॉय मेहता यांनी सांगितलं.


रुग्ण आकडा 
देशभरात महाराष्ट्रातला कोरोनाचा आकडा सर्वाधिक असण्यामागचं नेमकं कारण काय?
"सर्वाधिक नागरीकरण महाराष्ट्रात आहे. जगभरात कोविड नागरी भागात फोफावला आहे. 97 टक्के केसेस महानगरपालिका क्षेत्रात आहेत. दोनवरून आज 100 लॅब्स उभारल्या आहेत. जगात काय नवीन सुरु आहे, याचा उपयोग करुन प्रोटोकॉल केला जात आहे," अशी माहिती मुख्य सचिवांनी दिली.


बेड आणि हॉस्पिटलची लूट 
रुग्णांसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न बेड आणि खाजगी हॉस्पिटल्सकडून होणारी लूट हा आहे? यावर तोडगा काढण्यासाठी सरकार काय पावलं उचलतंय?
अजॉय मेहता म्हणाले की, "प्रशासन म्हणून स्वस्थ बसलो नाही. जशा समस्या समोर आल्या तसे उपाय करत गेलो. विमा योजना राबवला आणि 80 टक्के खाजगी बेड्स ताब्यात घेतले. फ्रण्टलायनर्ससाठी ट्रेन सुरु केल्या. महापालिकेचे ऑडिटर्स नेमले आणि तक्रारी प्राप्त झाल्यावर पैसे परत केले आहेत."


कम्युनिटी ट्रान्समिशन
आपण कम्युनिटी ट्रान्समिशन फेजमध्ये नसल्याचा दावा करत असलो तरी अनेक रुग्णांचे इंडेक्स केस ट्रेस होत नाहीत. मग या स्टेजला नेमकी कुठली फेज म्हणता येईल?
महाराष्ट्रात अजूनही कम्युनिटी ट्रान्समिशन नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. 9 मार्चला महाराष्ट्राचा डबलिंग रेट 3.8 दिवस होता, हाच दर कायम राहिला तर मेअखेरीस राज्याच दीड लाख कोरोनाबाधित असतील, असं भाकित केलं होतं. पण मेअखेर आपल्याकडे फक्त 50 हजार केसेस होत्या. यावरुनच स्पष्ट होतं की हे कम्युनिटी ट्रान्समिशन नाही. पण या आजाराचा संसर्ग एवढा जास्त आहे की, लोकांनी सावध राहावं, घाबरण्याचं कारण नाही.


डेथ रेट कंट्रोल
देशातील सर्वात जास्त डेथ रेट जळगावसारख्या शहरात नोंद होत आहेत. डेथ रेट कमी करण्यासाठी प्रशासनाची काय रणनीती आहे?
मृत्यूदरासंदर्भात अजॉय मेहता म्हणाले की, "यासाठी दोन-तीन गोष्टींवर काम सुरुय. जिल्हा पातळीवर आजारी किंवा लक्षणं असलेल्यांवर वेळीच उपचार करणे, डॉक्टर्सचे संख्येत वाढ करतोय, जिल्हा पातळीवरच्या डॉक्टर्सशी टास्क फोर्स संपर्कात राहून नवीन गोष्टी अपडेट करतोय."


हॉटस्पॉट शिफ्ट 
मागच्या आठवड्याभरातील रुग्णसंख्या पाहता हॉटस्पॉट्स मुंबई-पुण्यासारख्या शरातून बाहेर ग्रामीण भागात शिफ्ट होत आहेत का? त्यानुसार सरकार उपाय योजना करत आहे का?
"अनलॉक करत असताना जिल्ह्यातील प्रवासामुळे लोक गावी जात आहेत. मात्र यासाठी जिल्हास्तरावर सर्व्हेलन्स वाढवण्यात आला आहे. त्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आलं आहे," असं मेहता म्हणाले.


डेथ डाटा घोळ
मृतांच्या नोंदीत आढळलेल्या विसंगतीबाबत सरकारने आतापर्यंत काय कारवाई केली आहे?
"मृतांच्या नोंदी आधी आपण मॅन्युअली करत होतो आता सगळं कम्प्युटराईज्ड करत आहोत. कोविड असल्याचं लपवण्यामागे काही हेतू असल्यास आम्ही कठोर कारवाई करणार. आकडे लपवण्यात कोणाचंच हित नाही. सुधारित आकडे समोर आले की आम्ही कारवाई करु. लोकं वाचवण्याला प्राधान्य, नंतर आकड्यांची जुळवाजुळ करु," असं मुख्य सचिवांनी स्पष्ट केलं.


अर्थविषयी अजॉय मेहता काय म्हणाले?


सरकारला कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या पगारासाठी ओपन मार्केटमधून लोन घेण्याची वेळ आलीय. या परिस्थितीत सरकारचा अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी प्राधान्यक्रम कसा असणार आहे?
- मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक क्षेत्रात तज्ज्ञांचे छोटे गट तयार केले आहेत. त्यांच्याकडून सूचना घेऊन उपाययोजना करत आहोत. महाराष्ट्र लवकरच या आर्थिक संकटातून बाहेर येईल याची मला खात्री आहे, असा विश्वास अजॉय मेहता यांनी व्यक्त केला.


मोठ्या संख्येने नोकऱ्या गमावणाऱ्यांचा रोजगार टिकवण्यासाठी सरकारकडे बॅक अप प्लॅन आहे का ?
याविषयी ते म्हणाले की, "नोकरी न जाण्यासाठी उद्योगधंद्यांना मदत करण्यासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय झाला आहे. आयटी क्षेत्रात मोठी बूम येणार आहे. विविध क्षेत्रांना मदतीचे पॅकेज करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे."


केंद्राकडून मदत आणि जीएस्टीच्या परताव्याबाबत राज्य सरकार समाधानी आहे का?
"समाधानी आहे की नाही यावर मी भाष्य करु शकत नाही. मात्र आपण केंद्राकडे पाठपुरावा करत आहोत. मदत मिळेल अशी अपेक्षा आहे," असं मेहता म्हणाले.


राज्यात अनेक मोठ्या प्रकल्पात चिनी कंपन्यांच्या गुंतवणुकीबाबत आणि नुकत्याच झालेल्या कराराबाबत सरकार फेरविचार करणार आहे का?
मेहता म्हणाले की, "महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी मोठं डेस्टिनेशन आहे. मात्र कोणाला परवानगी द्यायची कोणाला नाही त्याबाबत मी टिप्पणी करणार नाही,"


परप्रांतीय मजुरांचा प्रश्न सरकारला अधिक सक्षमपणे हाताळता आला असता का ?
- मजूर जाणं ही नैसर्गिक प्रतिक्रिया होती. लोक घाबरुन गेले. पण आम्ही सर्वतोपरी मदत केली. ट्रेनचे पैसे महाराष्ट्राने दिले. बसेस आपण दिल्या. आपण वेळेवरच मदत केली, असा दावा अजॉय मेहता यांनी केला.


राज्यात पॅकेज जाहीर होणार?
"पॅकेज असो की नसो पण त्यापेक्षा पुढे जाऊन शासन मदत करत आहे. आपण अनेक उपाययोजना अशा केल्या ज्या पॅकेजपेक्षा मोठ्या आहेत," असं सांगत पॅकेजच्या मुद्द्यावर बोलण्यास मेहता यांनी टाळाटाळ केली.


वादग्रस्त मुद्द्यांवर भाष्य


'प्रवीण परदेशींच्या बदलीबाबत टिप्पणी करणार नाही'
कोरोनासारख्या कठीण काळात तत्कालीन मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली का करण्यात आली? याबाबत विचारलं असता अजॉय मेहता म्हणाले की, "प्रवीण परदेशी एक अतिशय चांगले आणि कार्यक्षम अधिकारी आहेत. परंतु त्यांच्या बदलीबाबत मी टिप्पणी करणार नाही."


तुकाराम मुंढेंशी उपाययोजना, मदतीबाबत बोलणं होतं!
एकीकडे कोरोनाचं संकट असताना नागपूरमध्ये महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधींमध्ये जोरदार वाद सुरु आहे. आयुक्त आणि लोकप्रतिनिधींमधल्या विसंवादामुळे कोरोनाची स्थिती हाताळण्यावर परिणाम होतोय का? असा प्रश्न अजॉय मेहता यांना विचारण्यात आला. याविषयी ते म्हणाले की, "लोकशाहीत वाद होतो हे म्हणणं योग्य नाही , मात्र मतभेद असू शकतात. त्यातून मार्ग काढू शकतो. तुकाराम मुंढेशी उपाययोजनेबाबत, मदतीबाबत बोलणं होत असतं."


'नाराजी किंवा खुशीसाठी कोणताही अधिकारी काम करत नाही'
अजॉय मेहता यांच्या बदलीसाठी काँग्रेस आग्रही असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली आहे.
प्रभावी निर्णयप्रक्रियेसाठी प्रशासकीय कौशल्याला राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळणे किती महत्वाची असते? याबाबत अजॉय मेहता विचारणा करण्यात आली. "माझ्या प्रशासनात लोकाभिमुख कामं आणि या राज्याचे हित नेहमी केंद्रस्थानी राहिलेलं आहे. हे हित समोर ठेवून काम करताना त्यावेळी लाही लोक दुखावले गेले असतील तर नाईलाज आहे. मला वाटत नाही कोणी नाराज आहे पण माझ्या कामात फरक पडत नाही. नाराजी किंवा खुशीसाठी कोणताही अधिकारी काम करत नाही, असं अजॉय मेहता यांनी स्पष्ट केलं.


मुदतवाढीच्या प्रश्नावर अजॉय मेहता म्हणातात...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच तिसर्‍यांदा अजॉय मेहत यांचा कार्यकाळ वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारला पत्रं पाठवले आहे. परंतु राज्यात सध्या मुख्य सचिव आणि मंत्री असा वाद दिसत आहे. त्यातच पुन्हा या पदावर मुदतवाढ मिळाली तर हे आव्हान पेलण्यासाठी तयार आहात? यावर अजॉय मेहता म्हणाले की, " This question is not of my pay grade अशी इंग्रजीत म्हण आहे. अशा विषयावर मी बोलणं टाळतो."


Ajoy Mehta EXCLUSIVE कसा लढतोय महाराष्ट्र? राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांची सर्वात मोठी मुलाखत!