मुंबई: आज कोकणातील सर्वात मोठ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा आहे.  या यात्रेनिमीत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्ध मंत्रिमंडळ आंगणेवाडीत असणार आहे. तसेच सत्यजीत तांबे आज आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्यांवर नजर टाकूया.


मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प


आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. पालिकेवर प्रशासक असल्यानं आयुक्तच प्रशासक म्हणून यंदाचा अर्थसंकल्प  मांडणार आहेत. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे शिक्षण खात्याचं बजेट आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांना सादर करतील. तर अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू पालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर करतील. तर सकाळली 11.30 वाजता पालिका मुख्यालयात आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांची पत्रकार परिषद होईल.


अर्थसंकल्पातील अंदाजित तरतुदी काय असतील? 


- आरोग्य, पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे संकेत; आस्थापना खर्चाला कात्री लागणार
- कोरोनाने तब्बल अडीच वर्षांच्या काळात आरोग्याबाबत चांगलाच 'धडा' शिकवल्याने पालिकेच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पातही आरोग्याला विशेष प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 
- गेल्या वर्षीच्या आरोग्याच्या अर्थसंकल्पात 1800 कोटींची वाढ केल्याने एकूण अर्थसंकल्प 6624.41 कोटींवर गेला होता. या वर्षीही यात वाढ होण्याची शक्यता आहे. 
- मुंबईकरांना दर्जेदार नागरी सुविधा देण्यासाठी पायाभूत सुविधांसाठी देखील भरीव तरतूद, मात्र आस्थापना खर्चावर मर्यादा येण्याची शक्यता आहे.
- त्यामुळे गतवर्षीच्या 45949.21 कोटींच्या अर्थसंकल्पात या वर्षीही वाढ होण्याची शक्यता आहे. 
- मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी बजेटमधे स्पेशल तरतूद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे महापालिका आयुक्तांना आदेश.
- यंदाच्या पालिका बजेटमध्ये मुंबईतल्या रस्तांवर विशेष भर दिला जाऊ शकतो.
 
एप्रिल 1984 मध्ये द.म. सुखटणकर यांची पहिल्यांदा प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. यानंतर 12 नोव्हेंबर 1984 ते 9 मे 1985 या कालावधीत जे.जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले होते. मात्र पुन्हा एकदा 8 मार्च 2022 पासून मुंबई महानगरपालिकेत प्रशासक म्हणून चहल कामकाज पाहत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत तब्बल 36 वर्षांनी प्रशासकाच्या हाती कारभार असताना बजेट मांडले जाणार आहे.


कसबा आणि चिंचवडच्या जागेवर मविआचा उमेदवार ठरणार


कसबा आणि चिंचवडची जागा कुणाला याबाबत महाविकास आज निर्णय घेण्याची शक्यता आहे. तो निर्णय महाविकास आघाडी संयुक्तपणे जाहीर करणार आहे. कसबा आणि चिंचवडची जागा लढवण्यावरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत, परंतु शुक्रवारी या बैठकीत अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती नेत्यांनी दिलीय. पण आपण हा निर्णय मित्रपक्षांना विचारात घेऊन जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता कोण कोणती जागा घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे. 


सत्यजीत तांबे आज आपली भूमिका जाहीर करणार


नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयानंतर आज आमदार सत्यजित तांबे पत्रकार परिषद घेऊन दुपारी आपली पुढची भूमिका जाहीर करणार आहेत.  जे बोललं जातंय ते अर्धसत्य आहे, पूर्ण सत्य मी सांगणार आहे अस वक्तव्य यापूर्वी सत्यजित तांबे यांनी केलं होत. त्यामुळं सत्यिजत तांबे नेमकी काय भूमिका घेणार? सत्यजित तांबे काय बोलणार? याकडे सर्वांच लक्ष लागल आहे.


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी आज सकाळी साडेनऊ वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांची प्रकट मुलाखत होणार आहे. तर संध्याकाळी साडेपाच वाजता प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, किशोर कदम "सौमित्र" यांचा मुक्त संवाद असा कार्यक्रम आहे.


कोकणातील सर्वात मोठ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा


कोकणातील सर्वात मोठ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा आहे.  या यात्रेनिमीत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्ध मंत्रिमंडळ आंगणेवाडीत असणार आहे. शनिवार आणि रविवारी यात्रा असल्यानं मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. तर यात्रेनंतर संध्याकाळी 4 वाजता भाजपची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थिती सभा होणार आहे. सभेसाठी भाजपनं जोरदार तयारी केली आहे.


सर्वोच्च न्यायालयाचा आज 73 वा स्थापना दिवस


सुप्रिम कोर्टाचा आज 73 वा स्थापना दिवस साजरा केला जाणार आहे. सिंगापूरचे चीफ जस्टिस सुंदरेश मेनन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत. सकाळी 11 वाजता कार्यक्रमाला सुरूवात होईल.