सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपला जीव मुठीत घेऊन रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या 33 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये जवळपास 24 डॉक्टर तर 9 आरोग्य कर्मचारी आहेत. 


शासकीय रुग्णालयात उपचारासाठी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याच पद्धतीने नॉन कोविड रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर आधीच ताण वाढलेला आहे. रुग्णालयात वाढणारी गर्दी आणि रुग्णांची संख्या यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची बाधा होत आहे. 


Maharashtra COVID-19 lockdown Guidelines | राज्य सरकारचं Mission Begin Again; रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी


दुसरीकडे सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 43 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व प्रशिक्षणार्थी 15 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी सोलापुरात आले होते. यातील काही जणांना त्रास जाणवल्याने त्यांची तापसणी करण्यात आली. 


Maharashtra Coronavirus: चिंताजनक! राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 35 हजारहून अधिक कोरोना बाधित


सुरुवातीला 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना रुग्णालयात अॅडमिट करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. काही जणांचे अहवाल हे ट्रेनिंग संपल्यानंतर आल्याने त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात पाठवण्यात आले आहे. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य संजय लाटकर यांनी एबीपी माझाशी फोनवरून बोलताना दिली. 


Corona Update: देशात सलग दुसऱ्या दिवशी 62 हजारहून अधिक रुग्णांची नोंद, 24 तासात 312 रुग्णांचा मृत्यू


शासकीय रुग्णालयात सध्या 662 रुग्णांवर उपचार सुरू


शासकीय रुग्णालयात सध्या 662 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 458 नॉन कोव्हिडं रुग्ण आहेत. तर 204 कोरोना बाधित रुग्ण आहेत. अनेक रुग्ण गंभीर आजारामुळे शासकीय रुग्णालयात येतात. तर या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जवळपास 250 डॉक्टर सेवा बजावत आहेत. त्यातील 193 डॉक्टर हे निवासी डॉक्टर आहेत. त्यातच आता 24 डॉक्टर पॉसिटीव्ह आल्याने उर्वरित डॉक्टरांवरील ताण आणखी वाढणार आहे.


सांगोला तालुक्यातील सबजेलमधील 24 कैद्यांना कोरोनाची लागण


सोलापूर जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव आता तुरुंगात देखील जाणवू लागला आहे. जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सबजेल मधील 24 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सांगोला सबजेलमध्ये 54 कैदी आहेत. त्यातील काही जणांना त्रास जाणवू लागल्याने तपासणी करण्यात आली होती. तपसणी करण्यात आलेल्या कैद्यांपैकी 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या कैद्यांना सबजेलमध्येच वेगळे ठेवून उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर उर्वरित कैद्यांना सबजेलमधील दुसऱ्या बराकमध्ये हलवले आहेत.