जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाच्या लक्षणात अनेक बदल दिसून येत असल्याने उपचार करताना अनेक अडचणी समोर येत आहेत. दुसऱ्या लाटेतील  कोरोना अधिक घातक ठरत असल्याने कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असा सल्ला जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.


कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस कोरोनाच्या प्रारंभिक लक्षणात सर्दी, ताप, खोकला आला की कोरोनाची ही प्रमुख लक्षणे मानली जायची. आणि त्यानुसार चाचणी करून डॉक्टर उपचार करत असत. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या विषाणूंमध्ये अनेक बदल दिसून येत आहेत. त्यानुसार रुग्णांना विविध प्रकारची लक्षणे दिसून येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी,अशक्तपणा, जुलाब, चव जाणे, डोकेदुखी इत्यादी प्रकारची नवी लक्षणे दिसून येत आहेत.  त्यामुळे उपचार करणाऱ्या यंत्रणेला या नव्या लक्षणांशी जुळवून घेत उपचार करणे काहीसे अवघड जात आहे.


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आढळून येत असलेल्या रुग्णांचा विचार केला तर सुरुवातीच्या दोन तीन दिवस चांगला असलेला पेशंट अचानक सीरियस होत असल्याचं आणि तो पेशंट मृत्यूकडे जात असल्याच समोर आले आहे. हीच गोष्ट जास्त घातक ठरत असल्याने आपण काळजी घ्यायला हवी, असं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटलं.


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णांची लक्षणं पाहता अनेक जण त्याकडे टायफॉईड म्हणून पाहत आहेत. यामध्ये चार पाच दिवसांनंतर रुग्ण गंभीर होत असल्याचं निदर्शनात आलं आहे. सध्या टायफॉईडची कोणतीही साथ सुरू नसून अशा प्रकारची कोणतीही लक्षणे आढळली तर  तातडीने कोरोनाची चाचणी करून घ्या. निदान होताच लागलीच उपचार करून घेणे महत्त्वाचे आहे, असं अभिजीत राऊत यांनी म्हटलं.


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रसार हा वेगाने होतांना दिसून येत आहे. पहिल्या लाटेच्या वेळी एकाच दिवशी 1223 इतक्या रुग्णांची एकाच दिवशी नोंद करण्यात आली होती. ती आता मागे पडली असून 1600 च्या वर रुग्ण हे एकाच दिवसात आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचं आहे, असं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटलं.