मुंबई : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 35 हजारहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज तब्बल 35 हजार 726 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात आज मध्यरात्रीपासून रात्रीची जमावबंदी करण्यात आली आहे. तर औरंगाबाद शहरात 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली तर राज्यातही लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
आज नवीन 14 हजार 523 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण 2314579 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 3,03475 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 86.58% झाले आहे.


आज मध्यरात्रीपासून जमावबंदी
नव्या नियमावलीनुसार राज्यात रात्रीच्या जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यामध्ये पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असेल. रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत जमावबंदी कायम असेल. यामध्ये नाक आणि तोंड झाकण्यासाठी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे या नियमांचं पालन अनिवार्य असेल. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याऱ्यांस दंड ठोठावण्यात येणार आहे, शिवाय मद्य, पान, गुटखा, तंबाखू या पदार्थांचं सार्वजनिक ठिकाणी सेवन करण्यासही बंदी असेल. 


औरंगाबादमध्ये लॉकडाऊन
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता प्रशासनाने पूर्ण लॉकडाऊन  लावण्याचा निर्णय घेतला आहे. 30 मार्चच्या मध्यरात्रीपासून आठ एप्रिल मध्यरात्रीपर्यंत म्हणजे संपूर्ण 10 दिवसांसाठी हे लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाबी बंद राहणार आहेत. राज्यातील महानगरातील औरंगाबाद पहिलं शहर आहे. ज्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन होणार आहे.


अगदी किराणा मालाचे दुकान, दूध हे सुद्धा दुपारी बारावाजेपर्यंत उपलब्ध असतील आणि त्यानंतर पूर्णतः बंदी असेल. नागरिकांनी घराबाहेर पडायचं नाही अथवा गुन्हे दाखल होणार अशा पद्धतीचा इशारा प्रशासनाने दिला आहे. औरंगाबादमध्ये दिवसाला अठराशे रुग्णांची नोंद होत आहे. औरंगाबादेत अंशतः लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर प्रशासनाने कठोर निर्णय घेतलेला आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. महत्त्वाचं म्हणजे उद्योगांना या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे.