31 October In History : आजचा दिवस भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भारताचा इतिहास, राजकारणावर आपल्या कार्याने ठसा उमटवणाऱ्या दोन महान नेत्यांचा आजच्या दिवसाशी संबंध आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन आहे. तर, 'आर्यन लेडी' इंदिरा गांधी यांची आजच्याच दिवशी हत्या झाली होती.
1875 : स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान देणारे स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा आज जन्मदिन. वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा,आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. 1934 आणि 1937 च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.
वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले.
सरदारांनी भारतातील 565 अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी आणि वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. सरदार पटेल यांनी धर्मांधतेविरोधात ठाम भूमिका घेतली होती.
1920 : ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे उद्घाटन सत्र मुंबईत पार पडले
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत भरले होते. लाला लजपत राय या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.
1975: संगीतकार व गायक सचिन देव बर्मन याचं निधन
सचिनदेव बर्मन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार आणि पार्श्वगायक होते. त्यांचा जन्म सध्या बांगलादेशात असलेल्या कोमिल्ला या ब्रिटिश भारतातील गावात झाला. चित्रपटसृष्टीत एस.डी. म्हणून परिचित असलेले सचिन देव बर्मन हे त्रिपुरातील राजघराण्यातील सदस्य होते. त्यांनी 1937 मध्ये बंगाली चित्रपटांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी संगीत देण्यास सुरुवात केली. एसडी बर्मन हे सर्वात यशस्वी आणि प्रभावशाली भारतीय चित्रपट संगीतकार बनले. बर्मन यांनी बंगाली चित्रपट आणि हिंदीसह 100 हून अधिक चित्रपटांसाठी संगीत दिले.
बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली गीते किशोर कुमार, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, गीता दत्त, मन्ना डे, हेमंत कुमार, आशा भोसले, शमशाद बेगम, मुकेश आणि तलत महमूद यांच्यासह त्या काळातील आघाडीच्या गायकांनी गायली. पार्श्वगायक म्हणून बर्मन यांनी 14 हिंदी आणि 13 बंगाली चित्रपट गाणी गायली.
अष्टपैलू संगीतकार असण्यासोबतच त्यांनी बंगालच्या हलक्या अर्ध-शास्त्रीय आणि लोकशैलीतील गाणीही गायली. त्यांचा मुलगा आर.डी. बर्मन हे देखील प्रसिद्ध संगीतकार होते.
1984 : पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या
देशातील सर्वात शक्तिशाली आणि दृढ निश्चय असलेली व्यक्ती अशी ओळख असलेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आज स्मृतीदिन. इंदिरा गांधी हे भारताच्या राजकारणातील एक असे नाव ज्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य नेहमीच चर्चेत राहिले. देशाच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान या नात्याने त्यांनी असे अनेक निर्णय घेतले, ज्यामुळे मोरारजी देसाई ज्या इंदिराजींना ‘गूंगी गुडिया’ असं म्हटलेल्या इंदिरा गांधी ‘आयर्न लेडी’ म्हणून उदयास आल्या. त्या भारताच्या चार वेळा पंतप्रधान झाल्या. इंदिराजींचे काही निर्णय वादग्रस्त राहिले. पंतप्रधान म्हणून त्यांच्या शिफारशीवरून देशात लागू करण्यात आलेली आणीबाणी ही त्या निर्णयांमध्ये गणली जाते. ज्यामुळे त्यांना आपली सत्ता गमवावी लागली. त्यांच्याच पंतप्रधानपदाच्या कार्यकालात 1971 साली पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांग्लादेशची निर्मिती झाली होती. आणखी एक वादग्रस्त निर्णय त्यांच्या मृत्यूचे कारण बनला.
पंजाबमध्ये वाढीस लागलेल्या खलिस्तानी चळवळीविरोधात त्यांनी कठोर निर्णय घेतले. जून 1984 मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात त्यांनी भारतीय लष्कराला कारवाईचे आदेश दिले. 'ऑपरेशन ब्लू स्टार' असे या मोहिमेला नाव देण्यात आले. सुवर्ण मंदिरात लपलेला खलिस्तानी चळवळीचा नेता भिंद्रनवाले यांचा खात्मा करण्यास भारतीय लष्कराला यश आले. मात्र, सुवर्ण मंदिरात केलेल्या कारवाईमुळे शीख समुदाय नाराज झाला होता. अनेकांसाठी भिंद्रनवाले हा नायक ठरला होता. इंदिरा गांधी यांच्या आदेशाने लष्करी कारवाईची किंमत त्यांना जीव गमावून चुकवावी लागली. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींचे दोन शीख अंगरक्षक, सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी सफदरजंग रोड, नवी दिल्ली येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बागेत कथितपणे ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला म्हणून त्यांच्या सेवा शस्त्रांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. बिअंतने इंदिरा गांधींवर तीन वेळेस गोळ्या झाडल्या. तर, सतवंतने 30 राउंड फायर केले. या हल्ल्यात इंदिरा गांधी यांचा मृत्यू झाला. 2013 सालापासून इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो.
1984: भारताचे सहावे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.
भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर त्यांचे राजीव गांधी यांनी पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात राजीव गांधी यांना पंतप्रधानपदाची शपथ देण्यात आली. त्यावेळी राजीव गांधी यांचे वय अवघे 40 वर्ष होते.
भारताने आजवर पाहिलेल्या सर्व मोठ्या यशाचे श्रेय राजीव गांधींना जाते. त्यांनी अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाची बीजे पेरली तसेच तळागाळातील नेत्यांना सक्षम करण्यासाठी पंचायती राज संस्थांना बळकट केले.
राजीव गांधी यांनी भारतातील आयटी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्रांतीचे नेतृत्व खरे दूरदर्शी म्हणून केले. राजीव गांधी यांनी देशभरात उच्च शिक्षण कार्यक्रमांचा विस्तार करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचाही पुढाकार घेतला.
2005 : पंजाबी लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम याचं निधन
पंजाबी आणि हिंदी भाषांमधील प्रसिद्ध कवयित्री श्रीमती अमृता प्रीतम यांचा आज स्मृतीदिन. अमृता प्रीतम या भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात. स्वातंत्र्यपूर्व काळातील पंजाब राज्यातील गुंजरानवाला येथे झाला. त्यांचे बालपण लाहोरमध्ये गेले. शिक्षणदेखील तेथेच झाले. किशोरावस्थेत त्यांनी कविता, कथा व निबंध इत्यादी लेखन करण्यास सुरुवात केली. त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी काही साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.
वयाच्या 16 व्या वर्षी 'अमृत लेहरन' हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता.
स्वातंत्र्यानंतर, सामाजिक कार्यकर्ते गुरू राधा किशन यांनी दिल्लीत पहिले जनता ग्रंथालय आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. स्वातंत्र्यानंतर काही काळ सामाजिक कामातही अमृता प्रीतम सहभागी होत्या. या ग्रंथालयाचे उद्घाटन बलराज साहनी आणि अरुणा असफ अली यांच्या हस्ते झाले होते.
अमृता प्रीतम यांना 1957 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, 1958 मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, 1988 मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि 1982 मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रसीदी टिकट हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित आहे. त्याशिवाय, अदालत, उन्चास दिन, कोरे कागज, तेरहवाँ सूरज, दिल्ली की गलियाँ, रंग का पत्ता आदी कांदबऱ्या आहेत. त्याशिवाय, कस्तुरी, कागज ते कॅनवस, सुनहुडे, आदी काव्य संग्रह प्रकाशित आहेत. त्याशिवाय, त्यांनी ललित गद्य, कथा संग्रहांचे लेखन केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
1864 : नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले
1946: क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचा जन्म.
1966: दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
2009: मराठी ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते याचं निधन.