कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज (Kolhapur Shahu Maharaj) हे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेणार आहेत. मंगळवार (31 ऑक्टोबर) रोजी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज हे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत. पहाटे चार वाजता शाहू महाराज हे कोल्हापूरहून जालन्यासाठी रवाना होतील. दरम्यान मराठा आंदोलनाचा प्रश्न राज्यात चांगलाच पेटलाय. त्यातच मनोज जरांगे यांचं आंदोलनही दिवसागणिक तीव्र होत चालल्याचं पाहायला मिळतयं. त्यातच उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती देखील खालावत चालल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे शाहू महाराज हे जालन्यात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. 


दरम्यान मनोज जरांगे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषणात पहिल्याच दिवशी फोनवरुन संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगेंना पाणी पिण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन जरांगे पाटलांनी पाण्याचा घोट घेतला होता.  यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी शिवरायांचे वंशज म्हणून राजेंचा शब्द मोडला नसल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलं होतं. त्यानंतर जरांगे यांच्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी देखील संभाजीराजेंनी जरांगे पाटलांनी फोनकरुन चौकशी केली. 


पुन्हा पाणी पिण्याची संभाजीराजेंनी केली विनंती


संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी देखील फोन करुन त्यांची चौकशी केली. यावेळी त्यांनी जरांगे पाटलांना पाणी पिण्याची विनंती केली पण आग्रह केला नाही. यावर त्यांनी म्हटलं की, मी यावेळी तुम्हाला आग्रह करणार नाही पण विनंती नक्की करेन कारण हा लढा तुम्ही उभारलाय. त्यासाठी तु्म्ही व्यवस्थित असंण फार गरजेचं आहे. 


उदयनराजे भोसले फिरले माघारी


जालन्यातील आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांना  भेटण्यासाठी निघालेल्या उदयनराजे भोसले यांनी अचानक यू टर्न घेतला आहे. उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या निर्णयाने भूवया उंचावल्या असून चर्चेलाही उधाण आलं आहे. उदयनराजे यांनी आता पुण्यात थांबा घेतला आहे. आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील उपोषण करत असून त्यांचा आज सहावा दिवस उपोषणाचा आहे. त्यांनी बोलत आहे तोपर्यंत चर्चेला येण्याचे आवाहन सरकारला केलं आहे. जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे, पण सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यांदा केलेल्या उपोषणात उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली होती. 


दरम्यान आता शाहू महाराज देखील जरांगे पाटील यांची जाऊन भेट घेणार आहेत. त्यामुळे जरांगे पाटील त्यानंतर कोणती भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 


हेही वाचा : 


मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी निघालेल्या उदयनराजेंनी यू टर्न घेत पुण्याला कलटी मारली! बदललेल्या निर्णयानं चर्चेला उधाण