31 January In History: इतिहासाच्या दृष्टीने प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. काही घटना अशा असतात की ज्याचा परिणाम देशाच्या समाजकारणावर-राजकारणावरही दीर्घकाळ राहतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर, आजच्याच दिवशी डॉ. बाबासाहेबांनी मूकनायक या पाक्षिकाची सुरुवात केली होती.
1893: कोका कोलाचे ट्रेडमार्क पेटंट
आजच्या दिवशी कोका कोला चे ट्रेडमार्क कंपनीने पेटंट स्वतःच्या नावावर केले. कोका कोला कंपनी जगातील आघाडीची शीतपेय तयार करणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. कोका कोला अनेक वर्ष बाजारपेठेतील वर्चस्व टिकवून आहे.
1911 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसऱ्यांदा जन्मठेप
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना दुसर्या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव नेते आहेत. जन्मठेपेच्या शिक्षेसाठी सावरकरांना ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवले होते. अंदमानात सावरकरांनी 11 वर्ष ब्रिटिशांचा छळ सहन केला. पुढे त्यांची अंदमानातून सुटका करून ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले.
1920: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ’मूकनायक’ या पाक्षिकाची सुरुवात
वंचित, अस्पृश्य समाजाच्या वेदना आणि विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेत 'मूकनायक' या पाक्षिकाची सुरूवात केली. पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या अस्पृश्य समाजातील शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादक केले होते. पहिल्या अंकातील 'मनोगत' नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले. मूकनायक पाक्षिकासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 2500 रुपयांची आर्थिक मदत केली होती. आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत, अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकला.
1923 : परमवीर चक्र मिळणारे प्रथम भारतीय मेजर सोमनाथ शर्मा यांचा जन्म
परमवीर चक्राचे पहिले मानकरी मेजर सोमनाथ शर्मा यांचा जन्म. 1947-48 मधील भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान काश्मीरमध्ये त्यांना वीरमरण आले. पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना श्रीनगर विमानतळावर वीर मरण आले. सोमनाथ शर्माच्या काश्मीरमधील शौर्यमुळे त्यांना ह्या पदकाने गौरविण्यात आले. मेजर शर्मा हे चौथ्या कुमाऊन रेजिमेंटमध्ये होते.
1931 : गीतकार कवी-लेखक गंगाधर महांबरे यांचा जन्म
मराठीतील कवी लेखक, गीतकार, गंगाधर महांबरे यांचा जन्म मालवण येथे झाला. . पुण्याच्या "फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'मध्ये ग्रंथपाल म्हणून त्यांनी काही काळ काम केले. मराठी साहित्यविश्वात त्यांचे योगदान राहिले आहे. त्याशिवाय, त्यांनी नाटके, काही चित्रपटांसाठी गीतलेखनदेखील केले आहे.
1954 : एफएम रेडिओचे संशोधक ए. एच. आर्मस्ट्राँग यांचे निधन
एडविन हॉवर्ड आर्मस्ट्राँग हे अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता आणि शोधक होते. ज्यांनी एफएम (फ्रिक्वेंसी मॉड्युलेशन) रेडिओ आणि सुपरहेटेरोडाइन रिसीव्हर सिस्टम विकसित केलं होतं. त्यांनी 42 पेटंट मिळवले आणि अनेक पुरस्कार प्राप्त केले. त्यांचा नॅशनल इन्व्हेंटर्स हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय दूरसंचार युनियनच्या महान संशोधकांच्या यादीमध्ये त्याचा समावेश आहे.
1977 : अभिनेता अंकुश चौधरीचा वाढदिवस
मराठी रंगभूमी-चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करणारा अभिनेता अंकुश चौधरी याचा आज वाढदिवस. एकांकिका, रंगभूमीपासून सुरू झालेला प्रवास मालिका-चित्रपटसृष्टीतही जोमदारपणे सुरू आहे.
2000 : नाटककार वसंत कानेटकर यांचे निधन
मराठी नाट्यसृष्टीत मोलाचे योगदान देणारे नाटककार वसंत कानेटकर यांचा स्मृतीदिन. कानेटकरांनी 43 नाटके आणि चार कादंबऱ्यांचे लेखन केले. त्यांची नाटके व्यावसायिकदृष्ट्या खूप यशस्वी झाली. अखेरचा सवाल, अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, जिथे गवतास भाले फुटतात, प्रेमा तुझा रंग कसा, सूर्याची पिल्ले आदी नाटके गाजली. वसंत कानेटकरांनी हिराबाई पेडणेकर यांच्या जीवनावर कस्तुरीमृग, बाबा आमटे यांच्या जीवनावर वादळ माणसाळतंय, इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांच्या जीवनावर विषवृक्षाची छाया आणि महर्षी कर्वे आणि बायो यांच्या जीवनावर हिमालयाची सावली ही नाटके लिहिली. वसंत कानेटकर यांच्या नाटकांचा हिंदी आणि गुजराती भाषेत अनुवाद झाला आहे.
2004 : अभिनेत्री आणि गायिका सुरैय्या यांचा स्मृतीदिन
अभिनेत्री आणि गायिका सुरैय्या यांचा स्मृतीदिन. शास्त्रीय संगीताचे कोणतेही धडे गिरवले नसताना आपल्या आवाजाने चित्रपटसृष्टीत सुरैय्या यांनी स्थान निर्माण केले होते. सुरैय्या यांनी अवघ्या 13 व्या वर्षी शारदा या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले होते. संगीतकार नौशाद यांनी ही संधी दिली होती. सुरैय्या यांनी अनेक चित्रपटात सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले. के. एल. सहगल यांच्यासोबतच्या परवाना चित्रपटात गायलेल्या गीतांमुळे सुरैय्यांची ओळख अभिनेत्री-गायिका अशी झाली. कधी काळी चित्रपटसृष्टीत सुरैय्या या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकार होत्या.