Deputy Collector's Suspension : राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला सरकारने दिलेले आहेत. मात्र यामध्ये प्रशासनाची उदासीनता काही प्रमाणात पाहायला मिळते. कारण राज्यातील तब्बल 30 वरिष्ठ महसूल अधिकारी अद्यापही आपल्या पदावर रुजू झालेले नाहीत.


क्रीम पोस्टिंगसाठी 30 उपजिल्हाधिकाऱ्यांची कामावर हजर होण्यास टाळाटाळ


मनासारखी पोस्टिंग न मिळाल्याने तब्बल 30 उपजिल्हाधिकारी यांनी दोन महिन्यापासून पोस्टिंग स्वीकारलेली नाही. यातील बरेचसे अधिकारी अजूनही मंत्रालय आणि मंत्र्यांच्या दालनामध्ये फेऱ्या मारताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि आपत्तीग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी अनेक ठिकाणी प्रशासन कमी पडताना पाहायला मिळत आहे. 


टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई


बदली झालेल्या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून अनेक महसूल अधिकारी अद्यापही रुजू झाले नाहीत अशा सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करत विभागीय आयुक्त पातळीवर चौकशी करण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 'एबीपी माझा' ही बातमी लावून धरल्यानंतर महसूलमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.


उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक, मात्र अधिकारी हजर नाहीत


गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तात्काळ पंचनामे करण्याच्या आदेश दिले. मात्र हे आदेश पाळण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये उपजिल्हाधिकारी हजरच नाहीत अनेकांच्या नेमणुका झाल्यात मात्र ते चार्ज घेत नसल्याचं 'एबीपी माझा'ने समोर आणल्यानंतर महसूल मंत्री विखे पाटील यांनी दखल घेत अशा हजार न होणाऱ्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्यानाचे आदेश दिले आहेत.


अधिकाऱ्यांचे निलंबन आणि सेवा खंडित करण्याचे आदेश


ज्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्यात त्या अद्यापही हजर नसतील तर त्यांचा तात्काळ निलंबन करावे विभागीय आयुक्त पातळीवर चौकशी करावी आणि सेवा खंडित करण्यात यावे, असे आदेश काढल्याची माहिती महसूलमंत्री विखे पाटील यांनी दिली आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, या निर्णयानंतर असे अधिकारी शुद्धीवर येतील असं मला वाटतं. आज राज्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थितीमुळे पिकांचं नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवून कामाच्या ठिकाणी हजर व्हायला हवं. आत्तापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक जागा रिक्त असायच्या अधिकारी हजर होत नव्हते. पहिल्यांदा आपण या दोन्ही ठिकाणी 100 टक्के जागा भरल्या आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी एका जिल्ह्यात अनेक वर्ष मनमानी सेवा केली. जी मक्तेदारी अशा अधिकाऱ्यांनी निर्माण केली होती, ती आपण मोडीत काढत आहोत. अधिकाऱ्यांनी तात्काळ कामावर रुजू व्हावे अन्यथा निलंबनाची कारवाई सुरू होईल, असा इशारा महसूलमंत्र्यांनी दिला आहे.