Maharashtra Politics : मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) नाराजीबाबत अनेक बातम्या येत आहे. पंकजा मुंडे आपल्या पक्षात नाराज असल्याचे दावे देखील केले जात आहे. विशेष म्हणजे, अशा चर्चा सुरु असताना पंकजा मुंडे यांनी दोन महिन्यांचा राजकीय ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चा अधिकच होऊ लागल्या. मात्र, पंकजा मुंडेंच्या बाबत नाराजीच्या चर्चा सुरु असतानाच दिल्लीतून त्यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, या कार्यकारणीत पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा स्थान देण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडेंच्या नाराजीवर भाजपने हा पर्याय शोधला असल्याची चर्चा आहे.  


भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय यादीत पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांच्यावरील राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी पुन्हा एकदा कायम ठेवण्यात आली आहे. पंकजा मुंडे या त्यांच्याच पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरु असताना पंकजा यांच्याकडे ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा झाल्या. मात्र, मी भाजपमध्येच राहणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. तर, सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे दोन महिने राजकारणातून सुट्टी घेत असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते. परंतु, पंकजा मुंडे यांनी दोन महिने राजकारणातून ब्रेक घेण्याच्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करावा, असे निर्देश भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण पंकजा आपल्यावर निर्णयावर ठाम असल्याचे दिसून आले. 


महाराष्ट्रातून तिघांना मिळाली संधी...


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. पक्षातील महत्वाच्या नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात येत आहे. दरम्यान, याचवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाची नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली आहे. ज्यात महाराष्ट्रातील तिघांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. विनोद तावडे, विजया राहटकर यांच्यासह पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय टीममध्ये संधी दिली गेली आहे. ज्यात विनोद तावडे यांना राष्ट्रीय महामंत्रिपदाची, तर विजया राहटकर आणि पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी दिली गेली आहे. 


फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा...


भाजपची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर झाल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, 'भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्ती झाल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन. मिशन 2024 च्या ऐतिहासिक यशासाठी आणि आमचे नेते नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्यासाठी संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा...' तसेच यावेळी त्यांनी विनोद तावडे, विजया ताई रहाटकर आणि पंकजा मुंडे यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Pankaja Munde : दोन महिन्यांचा 'राजकीय ब्रेक' घेण्याच्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करा; पंकजा मुंडे यांना दिल्लीतून आदेश, सूत्रांची माहिती