30 March In History : आजचा दिवस कलाक्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. कलाक्षेत्राशी संबंधित महान व्यक्तींचा आज जन्मदिवस आणि स्मृती दिवस आहे. 'फर्स्ट लेडी ऑफ इंडियन सिनेमा' देविका राणी यांचा आज जन्मदिवस आहे. तर, कथा, मासिकांमध्ये प्रकाशित होणाऱ्या पात्रांना जिवंत स्वरुप देणारे चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचा स्मृतीदिन आहे.
1853 : डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांचा जन्म
व्हिन्सेंट विल्हेम व्हॅन गॉघ या अभिजात चित्रकाराचा 30 मार्च 1853 रोजी नेदरलॅंडमधील एका लहानशा गावी जन्म झाला. मरणोत्तर पाश्चात्य कला इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्ती झाले. एका दशकात, त्यांनी सुमारे 2,100 कलाकृती तयार केल्या, ज्यात सुमारे 860 तैलचित्रांचा समावेश आहे, त्यापैकी बहुतेक त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दोन वर्षांच्या आहेत. यामध्ये लँडस्केप, स्थिर जीवन, पुतळे आणि स्वत: ची चित्रे यांचा समावेश आहे आणि आधुनिक कलेच्या पायाभरणीत योगदान देणारे ठळक रंग आणि नाट्यमय, आवेगपूर्ण आणि अभिव्यक्त रंगाने वैशिष्ट्यीकृत आहेत. व्यावसायिकदृष्ट्या ते अपयशी ठरल्याने गरिबीशी त्यांना झुंज द्यावी लागली. या तणावातून त्यांनी वयाच्या 37 व्या वर्षी आत्महत्या केली असल्याचे म्हटले जाते.
1908 : अभिनेत्री देविका राणी यांचा जन्म
'फर्स्ट लेडी ऑफ इंडियन सिनेमा' अशी ओळख असलेल्या अभिनेत्री देविका राणी यांचा आज जन्मदिवस. 1930 ते 1940 दरम्यान त्या भारतीय चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून सक्रिय होत्या. त्यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. चित्रपट निर्माते हिमांशू रॉय हे त्यांचे पती होते. इंग्लंड, जर्मनीमध्ये हिमांशू रॉय यांनी काही चित्रपटांची निर्मिती-दिग्दर्शन केले होते. त्यात देविका राणी यांनी मदत केली होती. पुढे हे दाम्पत्य 1934 मध्ये भारतात आले आणि त्यांनी बॉम्बे टॉकीज या चित्रपट निर्मिती संस्थेची सुरुवात केली. पुढील पाच-सहा वर्षात बॉम्बे टॉकिजने निर्मिती केलेल्या चित्रपटांनी आपली छाप सोडली. यामध्ये देविका राणी यांची भूमिका होती.
1942 : भाषातज्ज्ञ, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म.
मराठी साहित्य विश्वातील साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांचा आज जन्मदिवस. वसंत डहाके हे मराठीतील भाषातज्ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत. वर्ष 1966 मध्ये 'योगभ्रष्ट' या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशझोतात आले. "चित्रलिपी" या संग्रहाकरिता 2009 सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. 2012 च्या चंद्रपूर येथे झालेल्या 85 व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
1976 : चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचे निधन
अनेक साहसी कथा, मासिकांमध्ये प्रकाशित होणाऱ्या पात्रांना जिवंत स्वरुप देणारे आणि देवी-देवतांची चित्रे काढून घरोघरी चित्रकलासंस्कार पोचवण्याचे काम करणारे चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचा आज स्मृतीदिन. प्रल्हाद केशव अत्रे, विनायक दामोदर सावरकर, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी, अ.वा. वर्टी यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांवर त्यांनी चित्रे काढली. दीपलक्ष्मी, धनुर्धारी, वसंत, अनुप्रिता, नंदा, माधुरी, माणिक, अलका, पैंजण अशा अनेक नियतकालिकांची व त्यांच्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने सजली.
बाबूराव अर्नाळकरांचे धनंजय, छोटू, झुंझार-विजया, काळापहाड, धर्मसिंग, चारुहास आदी गुप्तहेर मुळगावकरांनी साकारले होते. त्यांच्या कुंचल्यातून साकारलेली पात्रे लोकांना खरी वाटत असे इतका जिवंतपणा त्यांच्या छायाचित्रात होता.
2002 : आनंद बक्षी यांचे निधन
आपल्या सदाबहार गाण्यांनी लोकांना वेड लावणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा आज स्मृतीदिन. 'आराधना', 'अमर प्रेम' आणि 'कटी पतंग' सारखे चित्रपट आनंद बक्षी यांच्या कारकिर्दीतील सुरुवातीला मैलाचा दगड ठरले. त्यानंतर आनंद बक्षी यांनी चित्रपटसृष्टीत आपले स्थान भक्कम केले. आपल्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 600 हून अधिक चित्रपटांसाठी चार हजारांहून अधिक गीतांचे लेखन केले. फिल्मफेअर पुरस्कारात त्यांना सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून 40 वेळा नामांकन मिळाले होते. त्यापैकी चार वेळा त्यांना पुरस्कार मिळाला.