मुंबई: आज देशभरात राम नवमीचा उत्साह असून त्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. सोबतच आज सलमान खान, अनुष्का शर्मा आणि नवाझुद्दीन सिद्दिकेच्या याचिकेवर सुनावणी आहे. तसेच किशोरी पेडणेकरांच्याही याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.


आज देशभरात राम नवमीचा उत्साह


आज देशभरात राम नवमीचा उत्साह असून ही नवमी धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. यानिमित्त अयोध्येत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच महाराष्ट्रात नागपूर, नाशिक, सातारा, मुंबईसह राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी राम नवमी साजरी केली जात आहे. 


सलमान खानच्या याचिकेवर सुनावणी


बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या याचिकेवर हायकोर्टाचा आज निर्णय. त्याने तातडीचा दिलासा मागत हायकोर्टात धाव घेतली आहे. एका पादचाऱ्यावर हल्ला करून त्याला धमकावल्या प्रकरणी सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर अंधेरीच्या डीएन नगर पोलीस ठाण्यात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाने याच प्रकरणात आज हजेरीसाठी सलमानला समन्स पाठवलं आहे. ते समन्स रद्द करण्याची सलमाननं मागणी केली आहे.


अनुष्का शर्माच्या याचिकेवर सुनावणी


अभिनेत्री अनुष्का शर्मानं विक्रीकर विभागाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. साल 2012-13 आणि 2013-14 ची थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री कर विभागाने बजावलेल्या नोटीसविरोधात अनुष्कानं ही याचिका दाखल केली आहे. दोन्ही वर्षांसाठी आलेल्या दोन स्वतंत्र नोटिसांना अनुष्कानं दोन स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिलं आहे. या याचिकांवर उत्तर देत प्राप्तीकर विभगानं आपल्या कारवाईचं समर्थन केलं आहे, त्यावर आज सुनावणी होईल.


नवाझुद्दीन सिद्दिकीच्या याचिकेवर सुनावणी


बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीची आपला भाऊ आणि पत्नी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव. या दोघांवर दाखल केला 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा. भाऊ शमशुद्दिन सिद्दीकी आणि पत्नी झैनब सिद्दीकी यांनी नवाझबाबत दिशाभूल करणारी वक्तव्यं केल्याचा याचिकेतून आरोप. त्याच्या विरोधातील पोस्ट आणि आर्टिकल बदनामीकारक असून नवाझुद्दीनची सार्वजनिक जीवनात प्रतिमा मलिन केल्याचा याचिकेतूना दावा.


किशोरी पेडणेकर यांच्या याचिकेवर सुनावणी
 
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना हायकोर्टानं दिलेला दिलासा आज संपणार. कथित एसआरए घोटाळा प्रकरणी तूर्तास आरोपपत्र दाखल न करण्याचे मुंबई पोलिसांना दिले होते निर्देश. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी किशोरी पेडणेकरांवी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे त्यावर आज सुनावणी होईल.