नाशिक : लहान मुलांसाठी देखील कोरोनाची लस येणार का? हा प्रश्न विचारण्यामागचे कारण म्हणजे नाशिक शहरातील एक धक्कादायक घटना. लहान मुलांना कोरोनाचा धोका अधिक नसल्याचं जरी निदर्शनास येत असलं तरी मात्र नाशिकमध्ये एका 3 महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याला इतरही काही गंभीर आजार होते. सर्वात कमी वयाच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही नाशिकमधील पहिलीच घटना आहे.


महापालिकेचे आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी एबीपी माझाशी बोलतांना दिलेल्या माहितीनुसार, एका 3 महिन्याच्या बाळाला इतरही काही दुर्धर आजार होते. त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया देखील पार पडली होती. तसेच कोरोनाची लागण झाल्याने उपचारादरम्यान एका रुग्णालयात या बालकाचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यातील ही घटना असून सर्व अहवाल तपासल्यानंतर शासनाच्या पोर्टलवरही याबाबत माहिती दिली गेली आहे. शहरात आतापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्ण 70 हजार 600 आहेत. त्यापैकी 3 हजार 300 रुगणांचे वय हे दहा वर्षाच्या आतील आहे. यावरूनच लहान मुलांना लागण होण्याचं प्रमाण कमी असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे घाबरण्याच काहीही कारण नाही मात्र काळजी घ्या, लहान मुलांना शक्यतो गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळा त्यांची विशेष काळजी घ्या असं नाशिककरांना त्यांनी आवाहन केलय.

दरम्यान लहान मुलांमध्ये कोरोनाची कोणती लक्षणं दिसून येतात ? कसे उपचार केले जातात ? कशी काळजी घ्यावी ? या प्रश्नांची उत्तरं आम्ही नाशिकमधील नामांकित बालरोग तज्ज्ञ मिलिंद भराडीया यांच्याकडून जाणून घेतली आहेत. भराडीया म्हणाले, कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास लहान मुलांना संसर्ग होऊ शकतो. सर्दी, खोकला, ताप तसेच उलट्या, जुलाब, पोट दुखणे आणि अशक्तपणा अशीही लक्षणं मुलांमध्ये आढळून येतात. लक्षणं सौम्य असतील तर होम क्वारंटाईन करत व्हिटॅमिन सी, झिंक आणि त्या वेळच्या गरजेनूसार औषधे दिली जातात मात्र कोरोनाचा धोका अधिक असेल तर रुग्णालयात दाखल करून उपचार करणे गरजेचे असते, वेळ पडल्यास स्टेरॉईड तसेच रेमडीसीव्हीरचाही डोस दिला जातो. कोविड 19 झाल्यानंतर एक महिन्यांनी अनेक लहान मुलांमध्ये कावासाकी नावाच्या आजाराची लक्षणं दिसून आली आहेत त्यामुळे कोरोनाचे वेळीच निदान करणे आणि योग्य ते उपचार घेणे गरजेचे आहे, लक्षणं दिसताच RTPCR चाचणी आणि रक्ताच्या तपासण्या कराव्यात. काही मुलांना जन्मतः ह्रदयरोग, किडनीचा आजार किंवा जन्मापासूनच एखाद्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर अशा बालकांची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. तसे बघितले तर कोरोनामुळे लहान मुलांचं मृत्यू होण्याचं प्रमाण जगभरात खूप कमी आहे आणि ह्याला कारण म्हणजे त्यांच्यात कोमॉरबीडीटी खूप कमी असते तसेच आपल्याकडे वेळोवेळी लसीकरण केले जाते महत्वाचं म्हणजे भारतात लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती अधिक चांगली आहे.

एकंदरीतच नाशिकमधील या घटनेमुळे आरोग्य विभाग आता अधिक सतर्क झालाय. एकीकडे भारतात कोरोना लस हा चर्चेचा विषय ठरत असून सर्वच जण या लसीच्या प्रतीक्षेत असतानाच लहान मुलांसाठी देखिल कोरोनाची लस येणार का ? असा प्रश्न नाशिकमधील या घटनेमुळे आता उपस्थित केला जात आहे.