मुंबई - केईएम रुग्णालयाच्या बालरोग विभागात गुरुवारी अचानक शॉर्टसर्किट झालं. या घटनेत हृदयावर उपचार घ्यायला आलेला अडीच महिन्यांचा चिमुरडा प्रिन्स गंभीररित्या जखमी झाला. चिमुकला प्रिन्स हा उत्तर प्रदेशमधून मुंबईत खास उपचारासाठी दाखल झाला होता. शॉर्टसर्किटच्या घटनेत प्रिन्सचा हात आणि कानाचा काही भाग भाजला त्यात प्रिन्सचा हात दंडातून कापावा लागला आहे.


प्रिन्सच्या आयुष्याची वाटचाल नुकतीच कुठे सुरु झालीये पण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे आयुष्यभर त्याला हात नसलेलं आयुष्य जगावं लागणार आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर आता भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळच्या उत्तरप्रदेशच्या मऊ जिल्ह्यातील कबिराजपुरमध्ये राहणारे पन्नेलाल राजभर यांना अडीच महिन्यांपूर्वीच एक पुत्रप्राप्ती झाली. पण, प्रिन्सची तब्येत सतत खालावलेल्या अवस्थेत होती. त्यानंतर, कुटुंबियांना प्रिन्सच्या छातीत छिद्र असल्याचे कळलं. त्यामुळे, कुटुंबीय बाळाला घेऊन मुंबईत असणाऱ्या आपल्या भावोजींच्या घरी दाखल झाले. त्यानंतर, उपचारांसाठी ते पालिकेच्या केईएम रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी तपासणी करत मंगळवारी बाळाला अॅडमिट करुन घेतलं. बुधवारी मध्यरात्री 2.50 वाजण्याच्या सुमारास बेडच्या बाजूला ऑक्सिजन आणि अन्य वायरमध्ये अचानक आग लागली. या आगीच्या घटनेमध्ये बाळाचा एक हात आणि एका बाजूचा चेहरा भाजला. त्यामुळेच प्रिन्सचा हात कापावा लागला.

रुग्णालयात असणाऱ्या मशीनच्या वायरमध्ये आग लागल्यामुळे आणि बेडवर ठेवलेल्या कागदाच्या गठ्ठ्याला आग लागली. या घटनेनंतर बाळाच्या हाताला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याचे समोर आले. त्यामुळं रुग्णालय प्रशासनाने बाळाचा हात दंडातून कापला. मात्र, यामध्ये रुग्णालयाचा भोंगळ कारभार स्पष्टपणे दिसत होता. म्हणून बाळाचे वडील पन्नेलाल राजभर यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात विद्युत उपकरणांचा सांभाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणात अद्याप दोषी कोण हे जरी सिद्ध झालं नसलं तरी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईल अशी आशा आहे.

उपचारानंतर आयुष्याची वाटचाल सुंदर व्हावी म्हणूज उत्तरप्रदेशवरुन आलेल्या प्रिन्सच्या नशिबात वेगळाच खेळ मांडला होता. पण यात रुग्णालयाकडून दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

संबधित बातम्या - 

केईएम रुग्णालयात रुग्णांच्या 150-200 नातेवाईकांचा गोंधळ, अपघातातील जखमींवर उपचार होत नसल्याचा आरोप

देशातील उत्कृष्ट रुग्णालयांमध्ये केईएमचा समावेश