मुंबई : देशातील उत्कृष्ट रुग्णालयांच्या यादीत मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयाची नोंद करण्यात आली आहे. 'द वीक हंसा' रिसर्च सर्व्हे 2018 मध्ये केईएम रुग्णालयाची अव्वल दर्जाचे रुग्णालय म्हणून नोंद झाली आहे.
अत्याधुनिक उपकरणांच्या स्पर्धेत आजही खासगी रुग्णालयांची चर्चा असते. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक किंग एडवर्ड मेमोरियल म्हणजेच केईएम रुग्णालयाने ही प्रथा मोडित काढली आहे. भारतातील उत्कृष्ट सरकारी रुग्णालयांच्या यादीत केईएम तिसऱ्या क्रमांकांवर असल्याची घोषणा 'द वीक हंसा' रिसर्च सर्व्हे 2018 मधून करण्यात आली आहे.
या सर्वेनुसार पहिल्या दोन क्रमांकावर देखील सरकारी रुग्णालये आहेत. मात्र त्या रुग्णालयांना केंद्राकडून अनुदान मिळत आहे. शिवाय हे अनुदान पालिका किंवा राज्य सरकारच्या अनुदानापेक्षा अधिक आहे. केईएम मात्र पालिका आणि राज्य सरकारच्या निधीवर चालत असूनही उत्कृष्ट सरकारी रुग्णालयांच्या पहिल्या पाचमध्ये आहे.
देशातील उत्कृष्ट खाजगी रुग्णालयांच्या यादीत मुंबईतील कोकीळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर रुग्णालयाचा पाचवा क्रमांक आहे. सहाव्या क्रमांकावर पी डी हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर आहे. तर लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे या सर्व्हेत सातव्या स्थानावर आहे.