27 April In History: इतिहासात प्रत्येक तारखेचे महत्त्व असते.  27 एप्रिल ही तारीख भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मामा वरेरकर ह्या नावाने विशेष प्रसिद्ध असलेले नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर यांचा जन्म दिवस आहे. तर, ज्येष्ठ अभिनेते, माजी केंद्रीय मंत्री विनोद खन्ना यांचा स्मृतीदिन आहे. महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांचाही स्मृतीदिन आहे. 


1883 : नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर यांचा जन्म


मामा वरेरकर ह्या नावाने विशेष प्रसिद्ध असलेले नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर यांचा जन्म. ‘जीवनासाठी कला’ही वरेरकरांची भूमिका होती. पुरोगामी नाटककार आणि कांदबरीकार अशी त्यांची ओळख होती. त्यांनी एकूण 37 नाटके, सहा नाटिका लिहिल्या. शिवाय कथा कांदंबऱ्या आणि रहस्यकथाही त्यांच्या नावावर आहेत. 1908 मध्ये त्यांनी 'कुंजविहारी' हे पहिले नाटक लिहिले. परंतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक म्हणजे रंगभूमीवर 1918 मध्ये आलेले 'हाच मुलाचा बाप' हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली व लेखनावरच लक्ष एकवटले. 1920 ते 1950 या काळातील मराठी साहित्यातील ते प्रसिद्ध नाटककार होते. त्यांच्या अनेक नाटकांचे भारतातील इतर प्रादेशिक भाषेतही अनुवाद झाला. 


नाटककार व साहित्यिक म्हणून ओळख असणारे वरेरकर राजकारणातदेखील सक्रिय होते. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. पुढे राज्यसभेवर त्यांची नियुक्तीही झाली होती. 


1912: अभिनेत्री जोहरा मुमताज सेहगल यांचा जन्मदिन


भारतीय अभिनेत्री, नर्तक आणि कोरिओग्राफर जोहरा सेहगल यांचा जन्मदिन. आपल्या 60 वर्षांहून अधिकच्या काळात अभिनेत्री म्हणून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. त्यांना 1963 मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, 1998 मध्ये पद्मश्री, 2001 मध्ये कालिदास सन्मान मिळाले. 2004 मध्ये संगीत नाटक अकादमी, जी भारतीय संगीत, नृत्य आणि नाट्य कलेतील राष्ट्रीय अकादमी आहे, त्याच्या आजीवन कर्तृत्वासाठीच्या संगीत नाटक अकादमी फेलोशिप ह्या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. 2010 मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.


1980 : सहकारमहर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचे निधन. 


आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना आपल्या अथक परिश्रमाने सुरू करणारे सहकार महर्षी  विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचा आज स्मृतीदिन. शेतकऱ्यांना सुखासमाधानाने आपले जीवन जगता यावे. त्याच्या मालाला बाजार मूल्य प्राप्त करून् देता यावे, शेतक-यांचे हालअपेष्टा थांबावेत, त्यांना स्वाभिमानाने स्वयंपूर्ण् जीवन जगता यावे या उद्देशाने अहमदनगर जिल्ह्यात लोणी या ठिकाणी देशातील पहिला सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना सुरू केला. विठ्ठलराव विखे-पाटील यांना महाराष्ट्रतील सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक मानले जाते. महाराष्ट्राला सहकार क्षेत्रात आज जो नावलौकिक प्राप्त झालेला आहे, त्याचे श्रेय विखे-पाटील यांना दिले जाते. विखे−पाटील यांनी सहकार, कृषी, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रांत केलेल्या मौलिक कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


2002: बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुलीच्या जनक रुथ हँडलर यांचे निधन


रुथ मारियाना हँडलर ह्या एक अमेरिकन व्यावसायिक महिला आणि शोधक होत्या. त्यांनी खेळणी उत्पादक 'मॅटेल' ही खेळण्याची कंपनी स्थापन केली. 1959 मध्ये, त्यांनी बार्बी डॉलचा शोध लावला. ज्याने जगभरात एक अब्जाहून अधिक खेळणी विकली. त्या जगातील सर्वात मोठी खेळणी कंपनीची संस्थापक आणि अध्यक्षा होत्या.  


2017 : भारतीय अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन. 


हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता, निर्माते आणि भारतीय राजकारणी  विनोद खन्ना यांचा आज स्मृतिदिन. कर्करोगासारख्या आजारासोबत त्यांची झुंज अपयशी ठरली. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पंजाबमधील गुरुदासपूरमधून ते खासदार होते. 


 1968 साली मन का मीत या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले; पण पुढे मात्र यांच्या नायकाच्या किंवा सहनायकी भूमिका लक्षवेधक ठरल्या. त्यांनी जवळपास 137 चित्रपटांमध्ये काम केले. लहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, मेरा गांव मेरा देश, कच्चे धागे, अचानक, परवरिश, अमर अकबर अ‍ॅन्थनी, मुकद्दर का सिकंदर, द बर्निंग ट्रेन आदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या.


आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्यांनी अचानकपणे  चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतली होती. त्यांनी आचार्य रजनीश यांचे शिष्यत्व पत्करले. त्यानंतर 1987 मध्ये सिनेसृष्टीत पुनरागमन केले. त्यांची दुसरी इनिंगही चांगली यशस्वी ठरली. आपल्या कारकीर्दीच्या अखेरच्या दिवसातही ते सिनेसृष्टीत कार्यरत होते. 2018 मध्ये त्यांना चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी सर्वोच्च पुरस्कार असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2002 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते मंत्रीदेखील होते.