26th May In History: आजचा दिवस महाराष्ट्राच्या रंगभूमीसाठी आणि राजकीय क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. गोविंदाग्रज या नावाने प्रसिद्ध असलेले मराठीतील नाटककार, विनोदी लेखक आणि कवी राम गणेश गडकरी यांचा आज जन्मदिन आहे. तर, प्रशासनावर मजबूत पकड आणि त्यातून लोकहिताची कामे, प्रभावी वक्तृत्वाने सभा गाजवणारे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जन्मदिन आहे.
1885: नाटककार, कवी आणि लेखक राम गणेश गडकरी यांचा जन्म
गोविंदाग्रज या नावाने प्रसिद्ध असलेले मराठीतील नाटककार, विनोदी लेखक आणि कवी राम गणेश गडकरी यांचा आज जन्मदिन. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे 150 कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहिली. राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’शेक्सपियर’ समजले जाते.
गडकरींचा जन्म 1885 रोजी नवसारी येथील गणदेवी या गावात झाला. महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या 'रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरिभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटके ही एव्हरग्रीन समजली जातात. सती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत.
1908: अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचे निधन
भारतीय धार्मिक नेते आणि इस्लाममधील अहमदिया चळवळीचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचे आजच्या दिवशी निधन झाले. गुलाम अहमद हे एक विपुल लेखक होते आणि 1880 मध्ये बराहीन-ए-अहमदिया (अहमदियाचे पुरावे, त्यांचे पहिले मोठे कार्य) च्या पहिल्या खंडाचे प्रकाशन आणि त्यांचा मृत्यू दरम्यान विविध धार्मिक, धर्मशास्त्रीय आणि नैतिक विषयांवर नव्वदहून अधिक पुस्तके लिहिली. त्यांचे अनेक लेखन इस्लामच्या बाजूने वादविवादात्मक आणि माफी मागणारे टोन धारण करतात. तर्कशुद्ध युक्तिवादाद्वारे धर्म म्हणून त्याचे श्रेष्ठत्व स्थापित करण्याचा प्रयत्न करतात, अनेकदा इस्लामिक शिकवणींचे स्वतःचे स्पष्टीकरण मांडून. त्यांनी इस्लामचा शांततापूर्ण प्रचार केला आणि लष्करी जिहादच्या परवानगीविरुद्ध जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी 1889 मध्ये पंजाब प्रांतात अहमदिया मुस्लिम समुदायाची स्थापना केली. आज 206 हून अधिक देशांमध्ये अहमदिया समुदायाला मानणारे लोक आहेत. त्यांची एकूण सदस्य संख्या एक कोटीहून अधिक आहे.
अहमदिया समुदायाचे अनुयायी अहमद यांच्या दाव्यावर विश्वास ठेवतात की तो शेवटचा प्रेषित होता. याबाबत, इस्लामच्या मुख्य प्रवाहाचा असा विश्वास आहे की अहमदिया समुदाय मुस्लिम नाही आणि मुहम्मद पैगंबर हे शेवटचे प्रेषित होते. अहमदने दावा केला की येशू ख्रिस्त त्याच्या वधस्तंभावर जाण्यापासून वाचला आणि नैसर्गिक मृत्यू झाला.
1945: माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांचा आज जन्मदिवस. विलासराव देशमुख यांनी 1974 मध्ये बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यावेळी त्यांचे वय 29 वर्ष होते. युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असे करीत करीत ते 1980 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
1982 मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिले नाही. पुढे 1995 पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला. विलासराव देशमुख यांची प्रशासनावर मजबूत पकड होती. प्रभावी वक्तृत्वाने त्यांनी अनेक सभा गाजवल्या
13 ऑक्टोबर,1999 ला विलासराव पहिल्यांदा आणि 2004 च्या निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पण 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्लाने त्यांना आपले मुख्यमंत्रीपद गमवावे लागले. पुढे ऑगस्ट 2009 मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले. 2009 ते 2011 दरम्यान केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे ते मंत्री होते. जानेवारी 2011 ते जुलै 2011 दरम्यानच्या काळात ग्रामविकासमंत्री आणि पंचायत खात्याचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. आपल्या कामाच्या शैलीने त्यांनी आपली छाप सोडली.
विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे काँग्रेसचे आमदार आहेत. तर, रितेश देशमुख हा अभिनेता, निर्माता आहे.
1946: प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय यांचा जन्मदिन
भारतातील माजी सामाजित कार्यकर्त्या अरुणा रॉय यांचा आज जन्मदिन. अरुणा रॉय,शंकर सिंग,निखिल डे आणि इतर अनेकांसह मजदूर किसान शक्ती संघटनेनी "मजदूर किसान शक्ती संघ" याची स्थापना केली. त्या त्यांच्या समाजातील दुर्बल घटकांसाठी केलेल्या कामाबद्दल ही ओळखले जात असे. अरुणा रॉय या राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या सदस्या होत्या.
भारतीय प्रशासकीय सेवेत असलेल्या अरुणा रॉय यांनी नोकरीचा राजीनामा देत गरीब आणि दुर्लक्षित असलेल्या विषयांवर काम करायला सुरुवात केली. भारताच्या माहितीचा अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष करणाऱ्या कामगारांसाठी योग्य आणि समान वेतनाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात त्यांचे योगदान मोलाचे आहे. 2011 मध्ये,टाईम मासिकाने जगभरातील 100 सर्वात प्रभावी व्यक्तींमध्ये अरुणा रॉय यांच्याही नावाचा समावेश होता.
इतर महत्त्वाच्या घटना:
1902 : नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव यांचा जन्म
1930: भारतीय-ईराणी भाषेतील शब्दलेखक आणि समीक्षक करीम इमामी यांचा जन्म
1989: मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उद्घाटन झाले.
1999: भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्धाची सुरुवात.