Jejuri News: महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत, खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन, जत्रा-यात्रा उत्सवांचे नियोजन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीवर गेल्या आठवड्यात सात विश्वस्तांच्या निवडी झाल्या. या निवडीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना डावलून जेजुरी (Jejuri) बाहेरील सहाजणांच्या निवडी राजकीय हस्तेक्षेपामुळे जेजुरी शहरात प्रचंड नाराजीचा सूर आहे. गुरुवारी, रात्री विश्वस्तपदाचा पदभार घेण्यासाठी आलेल्या विश्वस्तांविरोधात स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी केली यामुळे वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले होते. विश्वस्त निवडीच्या विरोधात शुक्रवारपासून रास्ता रोको, चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी, जेजुरीमध्ये ग्रामसभेत उद्या, शुक्रवारपासून रास्ता रोको आणि साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवस्थानाच्या सात विश्वस्तांपैकी 5 ते 6 विश्वस्त हे एकाच राजकीय पक्षाशी निगडीत असून ते बाहेरील रहिवासी आहेत, असा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला आहे. निवडीमध्ये एकच विश्वस्त स्थानिक निवडला आहे. जेजुरीतील सेवेकरी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना राजकीय हस्तक्षेपाने डावलले गेले आहे. ही बाब ग्रामस्थांसाठी अत्यंत दुर्दैवी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणं आहे.
मागील विश्वस्तांची मुदत डिसेंबर 2022मध्ये संपली होती. त्यानंतर धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात आली. विश्वस्तपदासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पुढील काळात शहरातील किमान चार जण निवडण्यात यावेत मागणी शहरातील अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली होती. मुलाखती वेळी जेजुरी गडाला पायऱ्या किती? देवांची भूपाळी-आरती येते का? गाभाऱ्यात मूर्ती किती? जत्रा यात्रा उत्सवांचे महत्त्व? देवसंस्थान निगडित अनेक प्रश्न मुलाखत देणाऱ्या उमेदवारांना विचारण्यात आले होते असे ग्रामस्थांच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, जेजुरीकर ग्रामस्थांना डावलून पुणे जिल्ह्यातील इतरत्र रहिवासी असलेल्या पाच व्यक्तींना निवडताना कोणते निकष लावले आहेत? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. मंदिरावर स्वतःच्या पक्षाची पकड राहावी म्हणूनच पक्षश्रेष्ठीनी निवड प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया जेजुरी शहरातून येत आहेत.
विश्वस्त माघारी फिरले
ग्रामसभा झाल्यानंतर गुरुवारी रात्री विश्वस्तपदाचा पदभार घेण्यासाठी आलेल्या विश्वस्तांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. देवस्थानाच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जेजुरीकर उपस्थित होते. जेजुरीकरांचा विरोध पाहून विश्वस्त माघारी परतले. आता, शुक्रवारपासून जेजुरीत साखळी उपोषण आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.