24 October In History : प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. काही ऐतिहासिक, महत्त्वाच्या घटना या दिवसात घडलेल्या असतात. आज जागतिक पोलिओ दिन आहे. संयुक्त राष्ट्र संघाचा आज स्थापना दिन आहे. आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा (Azad Hind Sena Captain Laxmi sehgal) जन्मदिन आहे. तर, आपल्या व्यंगचित्रातून देशातील कॉमन मॅनच्या व्यथा आणि राजकीय टिप्पणी करत व्यवस्थेला प्रश्न करणारे व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण (R K Laxman birth anniversary) यांचा जन्मदिन आहे. तर, सुप्रसिद्ध गायक मन्ना डे ( Manna Dey ) यांचा आज स्मृतीदिन आहे.
जागतिक पोलिओ दिवस
जागतिक पोलिओ दिवस दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. रोटरी इंटरनॅशनलने पोलिओमायलिटिस विरूद्ध लस विकसित करणाऱ्या जोनास साल्क यांच्या जन्माच्या स्मरणार्थ याची सुरुवात केली होती. जागतिक पोलिओ दिवस दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. रोटरी इंटरनॅशनलने पोलिओमायलिटिस विरूद्ध लस विकसित करणाऱ्या जोनास साल्क यांच्या जन्माच्या स्मरणार्थ याची सुरुवात केली होती. जागतिक पोलिओ दिवस दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. रोटरी इंटरनॅशनलने पोलिओमायलिटिस विरूद्ध लस विकसित करणाऱ्या जोनास साल्क यांच्या जन्माच्या स्मरणार्थ याची सुरुवात केली होती. जानेवारी 2014 मध्ये भारत हा पोलिओ मुक्त देश जाहीर करण्यात आला.
1914 : आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा जन्म
भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक क्रांतिकारी महिला, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी, आझाद हिंद सेनेच्या 'झाशीची राणी फलटणी'च्या पहिल्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा आज जन्मदिन.
लग्नापूर्वी त्यांचे लक्ष्मी एस. स्वामीनाथन असे नाव होते. मद्रास उच्च न्यायालयामध्ये फौजदारी कायदा करणारे वकील एस. स्वामिनाथन हे त्यांचे वडील होत. लक्ष्मी यांनी 1938 साली मद्रास मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली. एक वर्षानंतर त्यांना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रात पदविका मिळाली. चेन्नई येथे असलेल्या कस्तुरबा गांधी हॉस्पिटलमध्ये त्यांनी डॉक्टर म्हणून काम केले.एका वर्गमित्राच्या सांगण्यावरून त्या सिंगापूरला गेल्या (1940). तिथे त्यांनी भारतातून स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी दवाखाना उघडला.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. पुढे 2 जुलै 1943 रोजी सुभाषचंद्र बोस सिंगापूर भेटीवर आले होते. त्यांनी आझाद हिंद सेनेत महिलांची स्वतंत्र तुकडी असावी, अशी इच्छा व्यक्त केली. या आवाहनाला प्रतिसाद देऊन लक्ष्मी आझाद हिंद सेनेत प्रविष्ट झाल्या, शिवाय अनेक महिलांना त्यांनी सेनेत सामील होण्यास प्रवृत्त केले. सेनेतील राणी लक्ष्मी पलटणीचे नेतृत्व त्यांना दिले. 21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजींनी आझाद हिंद सरकारची घोषणा केली. लक्ष्मींना महिला आणि बालकल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री केले. 1944 पर्यंत सुमारे एक हजार महिला जवान व पाचशे परिचारिका जवान अशी पंधराशेची पलटण झाली. जपानी सैनिकांच्या मदतीने रायफल चालविण्याबरोबरच हातबाँब आणि गनिमी काव्याच्या व्यूहरचनेतून या महिला सैनिकांनी ब्रिटिशांना नामोहरम केले.
अमेरिकेने जपानमधील हिरोशिमावर अणुबाँब टाकला आणि जपानने शरणागती पतकरली. तेव्हा आझाद हिंद सेनेला माघार घ्यावी लागली. त्यांना रंगूनमध्ये अटक करण्यात आली. एक वर्ष त्या ब्रिटिशांच्या नजरकैदेत होत्या. भारतात आल्यानंतर आझाद हिंद सेनेतीलच कर्नल प्रेमकुमार सहगल यांच्याशी त्यांचा विवाह झाला. (कर्नल प्रेमकुमार सहगल हे गाजलेल्या 'लाल किल्ला खटल्या'तील एक आरोपी होते. या खटल्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांची बाजू मांडली.) पुढे 1947 मध्ये सहगल हे कानपूरमध्ये स्थायिक झाले. तर, लक्ष्मी सहगल यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर जखमी झालेल्या अनेक निर्वासितांवर त्यांनी मोफत औषधोपचार केले. त्यानंतर त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गेल्या. पक्षातर्फे त्यांची राज्यसभेवर निवड झाली. त्याशिवाय, बांगला देश युद्धानंतरच्या निर्वासितांसाठी त्यांनी कोलकातामध्ये छावण्या सुरू केल्या, वैद्यकीय मदत केली. भोपाळ वायु दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांसाठीही त्यांनी वैद्यकीय सेवा दिली.
आझाद हिंद सेनेत काम करण्याबरोबरच वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात कॅप्टन सेहेगल यांनी भरीव कामगिरी केली. भारत सरकारने 1998 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.
कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी 2002 मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक डाव्या आघाडीच्यावतीने लढवली होती. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याविरोधात त्यांचा पराभव झाला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या माजी खासदार सुभाषिणी अली आणि अनिसा पुरी या त्यांच्या कन्या आहेत. प्रसिद्ध नृत्यांगना आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक समजले जाणारे शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या पत्नी मृणालिनी साराभाई या कॅप्टन सहगल यांच्या धाकट्या भगिनी होत.
1921 : व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांचा जन्म
आपल्या व्यंगचित्रातून देशातील कॉमन मॅनच्या व्यथा आणि राजकीय टिप्पणी करत व्यवस्थेला प्रश्न करणारे व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण अर्थात आर. के. लक्ष्मण यांचा आज जन्मदिन.
मुंबईतील फ्री प्रेस जर्नलसाठी राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांची पहिली पूर्णवेळ नोकरी होती. नंतर, ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये सामील झाले आणि द कॉमन मॅन या पात्रासाठी प्रसिद्ध झाले, जो लक्ष्मण यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. 1951 मध्ये सुरू झालेल्या टाइम्स ऑफ इंडियातील "यू सेड इट" या त्यांच्या दैनिक व्यंगचित्रांसाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत.
कॉमन मॅन, मालगुडी डेज, एशिनन पेंट्समधील गट्टू अशी अजरामर कार्टून्स आर के लक्ष्मण यांनी रेखाटली. 24 ऑक्टोबर 1921 रोजी म्हैसूरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. आर के लक्ष्मण यांनी रेखाटलेला 'कॉमन मॅन' सर्वांच्याच काळजाला भिडला. त्याशिवाय त्यांनी कुंचल्यातून अनेक राजकीय घडामोडींवर अचूक भाष्य केलं होतं.
घटनांचे अचूक टिपण, उत्तम निरीक्षण, बुद्धिमत्ता, आत्मविश्वास याच्या जोरावर लक्ष्मण यांची व्यंगचित्रे सहजच लक्षात राहतात. आसपासच्या घटना मिस्किलपणे दाखवीत असल्याने लक्ष्मण यांची चित्रे खास आहेत.
आर. के. लक्ष्मण यांना 1973 मध्ये पद्मभूषण आणि 2005 मध्ये पद्मविभूषण या नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्याशिवाय, 1984 मध्ये पत्रकारिता, साहित्य आणि क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आर्ट्ससाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला.
1945 : संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना
1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को शहरात सभा आयोजित करण्यात आली होती. जगभरात शांतता प्रस्थापित व्हावी याकरिता यामध्ये चर्चा करण्यात आली. त्या सभेतील सुमारे पन्नास देशांनी एकत्र येवून देशांत शांतता प्रस्तापित व्हावी याकरिता एक विधायक तयार केले. त्यानंतर सर्वांनी हस्ताक्षर करत संयुक्त राष्ट्राची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाच्या जागी देशा-देशांमधील युद्धे थांबविण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरविण्याच्या उद्देशाने झाली होती. ही संस्था स्थापन करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता, पण भारताचे या संस्थेच्या कामापासून नेहमी अलिप्त राहण्याचे धोरण राहिले आहे. आपले कार्यक्रम रावबिण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक दुय्यम संस्था आहेत
1984 : देशातील पहिली भूमिगत मेट्रो रेल्वे सुरू
24 ऑक्टोबर 1984 रोजी कोलकाता येथेच देशातील पहिली भूमिगत मेट्रो रेल्वे सुरू झाली होती. कोलकाता मेट्रोने 1984 साली आजच्या दिवशी कामकाज सुरू केले होते. त्यावेळी कोलकाता मेट्रोची पायाभरणी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाली होती.
1991: ऊर्दू कथा व पटकथा लेखिका इस्मत चुगताई यांचे निधन
इस्मत चुगताई या प्रसिद्ध उर्दू लेखिका होत्या. त्यांचे शिक्षण अलीगढ व लखनौ येथे झाले. त्यांनी बी.ए., बी.टी. झाल्यावर बरेली व जोधपूर येथे अध्यापन केले. त्यानंतर त्यांनी मुंबईत शाळा-निरीक्षकेचे व शाळा-अधिक्षिकेचे काम केले.
इस्मत चुगताईंनी उर्दू तसेच इंग्रजी व रशियन साहित्याचे विपुल वाचन केले. बर्नार्ड शॉच्या लेखनाने प्रभावित होऊन त्यांनी फसादी हे आपले पहिले नाटक लिहिले. आपल्या सुरुवातीच्या कथा अश्लील वाटल्यामुळे त्यांनी स्वतःच फाडून टाकल्या; परंतु नंतरच्या कथांपैकी काही त्यांतील धिटाई आणि वाङ्मयीन गुण यांमुळे लोकप्रिय झाल्या. त्यांच्या ‘लिहाफ’ नामक कथेवर लाहोरच्या न्यायालयात अश्लीलतेचा खटला भरण्यात आला होता. ‘लिहाफ’ या कथेतल्याप्रमाणे आपल्या लेखनात त्या लैंगिक प्रसंगांचे व अनैतिक संबंधांचे निर्भीडपणे चित्रण करतात.मध्यमवर्गीय मुस्लिम युवतींच्या मानसिक अवस्थेचे त्यांचे निरीक्षण सूक्ष्म आणि सखोल आहे.
सौंदर्य, स्त्री-पुरुषसंबंध, सामाजिक रूढी आणि संकेत या संबंधीच्या आजच्या विचारपद्धतीत इस्मत चुगताईंना क्रांतिकारक बदल करावयाचा होता.. पुरुषसत्ताक समाजातील स्त्रीजीवनाची शोकात्म बाजूच आपल्या कथा-कादंबऱ्या लिहिण्यास त्यांना प्रेरक ठरली. भाषेवरील त्यांचे प्रभुत्व आणि व्याजोक्तिपूर्ण सूर यांमुळे त्यांच्या कथा-कादंबऱ्यांना आगळेच सौंदर्य प्राप्त झाले
2013: पार्श्वगायक प्रबोधचंद्र तथा मन्ना डे यांचे निधन (Manna Dey)
आपल्या आवाजाने रसिकांच्या मनाला आजही भुरळ पाडणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक आणि संगीतकार मन्ना डे यांचा आज स्मृतीदिन. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने केंद्र सरकारने सन्मानित केले.
हिंदी चित्रपटसृष्टीत तर मन्ना डे लोकप्रिय होतेच. परंतु, याचबरोबर त्यांनी अन्य प्रादेशिक भाषांमध्ये 3500 हुन अधिक गायली आहेत. त्यांनी बंगाली, भोजपुरी, पंजाबी, आसामी, गुजराती, कन्नड, मल्याळम आणि मराठी अशा विविध भाषांमध्ये गायलेली आजही तितकीच लोकप्रिय आहेत
एक चतुर नार करके सिंगार.., ए मेरे प्यारे वतन...ओ मेरी जोहर जबीं तुझे मालूम नही...चलत मुसाफिर मोह लिया रे.., लागा चुनरी में दाग मिटाऊॅं...., आदीसह अनेक गाणी लोकप्रिय आहेत. तर मराठीत -घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा- हे ‘वरदक्षिणा’ चित्रपटातील ग.दि. माडगूळकर यांचे गीत आणि वसंत पवार यांचे संगीत असलेले हे गाणे विशेष लोकप्रिय आहे. त्याशिवाय, धुंद आज डोळे.. हवा धुंद झाली, अ आ आई, म म मका...मी तुझा मामा, दे मला मुका, मी धुंद, तू धुंद यामिनी आदी गीते लोकप्रिय आहेत.
इतर महत्त्वाच्या घटना :
1605: मुघल सम्राट जहांगिर यांचा राज्याभिषेक झाला.
1775: दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचा जन्म.
1857: शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लब शेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.
1868: औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा जन्म.
1909: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्याचा उत्सव साजरा केला.
1910: मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री लीला ऊर्फ माई भालजी पेंढारकर यांचा जन्म.
1922: कॅडबरी चे संस्थापक जॉर्ज कॅडबरी यांचे निधन.
1935: भारतीय पत्रकार आणि लेखक म्हणून मार्क टुली यांचा जन्म.
1964: उत्तर र्होडेशियाला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले
2016: सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी.