मुंबई: शिवसेनेच्या दोन्ही गटांचा आज दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) पार पडत आहे. ठाकरे गटाचा मेळावा हा शिवाजी पार्कवर होणार आहे तर शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाचा हा दसरा मेळवा नाही तर शिमगा मेळावा आहे, ते त्यातून नुसता इतरांच्या नावाने शिमगा करणार अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. दरम्यान पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाचा हा पहिलाच मेळावा असून त्यांच्या धनुष्यातून कोणता बाण सुटणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये शिवसेनेमध्ये दोन गट पडले आणि शिंदे गटाने वेगळा सवतासुभा मांडला. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगामध्ये पक्ष आणि चिन्हाचा वाद जिंकला आणि शिवसेना हा पक्ष आपलाच असल्याचं सिद्ध केलं. त्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बाणाला अधिक धार आली आहे यात काही शंका नाही. तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या पुढील वर्षी होणार असून त्या पूर्वीचा हा मेळावा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे राज्यातील आपल्या कार्यकर्त्यांना आणि साथीदारांना कोणता संदेश देणार याचीही उत्सुकता आहे. 


एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील संभाव्य पाच मुद्दे 


1. उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गद्दार असल्याचं सांगत टीका केली आहे. त्याला सडेतोड उत्तर आज एकनाथ शिंदे देण्याची शक्यता आहे.


2. ठाकरेंचे हिंदुत्व बोगस, आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक


उद्धव ठाकरे यांनी नुकतंच समाजवादी परिवाराशी आघाडी केली आहे. तसेच त्यांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच्या युतीवरून आज एकनाथ शिंदे त्यांचा समाचार घेण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व कसे बोगस आहे आणि आपणच कसे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचे पाईक आहोत हे ठासवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतील.


3. मोदींचे गुणगाण


नरेंद्र मोदी हे केवळ भारतात नव्हे तर जगभरात त्यांच्या कार्याने ओळखले जात असून त्याचे करावे तितके कौतुक कमीच आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आधीही सांगितलं आहे. मोदींनी गेल्या 9 वर्षांमध्ये केलेली कामं, लोकोपयोगी योजना आणि जागतिक स्तरावर त्यांनी घेतलेली कणखर भूमिका याची उजळणी आज एकनाथ शिंदे पुन्हा एकदा करण्याची शक्यता आहे. 


4. मराठा आरक्षणावर भूमिका


राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापत आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी दिलेली मुदत संपणार आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे.


5. राज्य सरकारची विकासाची कामं


यंदाचा दसरा मेळावा हा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. पुढच्या वर्षाच्या सुरुवातील या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा राज्य सरकारची विकासविषयक कामं जनतेसमोर मांडण्यासाठी उत्तम व्यासपीठ असेल. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आज राज्य सरकारने केलेली कामं जनतेसमोर मांडतील.